दिल्ली अबकारी घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज राऊस ॲव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात येणार आहे. केजरीवाल यांना विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांच्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
28 मार्च रोजी न्यायालयाने केजरीवाल यांना आजपर्यंत ईडी कोठडीत पाठवले होते. 28 मार्च रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान, ईडीच्या वतीने एएसजी एसव्ही राजू, म्हणाले होते की, केजरीवाल तपासात सहकार्य करत नाहीत आणि सरळ उत्तरे देत नाहीत. अनेक कागदपत्रांची चौकशी त्यांच्याकडे करायची आहे.
आम आदमी पक्षाने लाच घेतली आणि गोवा निवडणुकीत त्याचा वापर केला, असे राजू यांनी सांगितले आहे. हा पैसा हवाला मार्गाने गोव्याच्या निवडणुकीत वापरला गेला हे सिद्ध करणारी कागदपत्रे आमच्याकडे आहेत. केजरीवाल जे पैसे भाजपला दिल्याचा आरोप करत आहेत त्याचा दारू घोटाळ्याशी काहीही संबंध नाही, असे राजू यांनी स्पष्ट केले आहे.
तर हजेरीदरम्यान केजरीवाल म्हणाले होते की, हे राजकीय षडयंत्र आहे, जनता त्याला प्रत्युत्तर देईल. सुनावणीदरम्यान खुद्द केजरीवाल यांनी न्यायालयात आपले म्हणणे मांडताना ईडीच्या तपासानंतर खरा घोटाळा सुरू झाल्याचे सांगितले होते.आम आदमी पार्टी संपवणे आणि आम आदमी पार्टी भ्रष्ट असल्याचा अफवा पसरवणे हा ईडीचा उद्देश असल्याचे केजरीवाल यांनी म्हंटले आहे.
अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण न दिल्यानंतर, त्याच दिवशी संध्याकाळी उशिरा चौकशी केल्यानंतर ईडीने केजरीवाल यांना अटक केली होती. 27 मार्च रोजी हायकोर्टाने केजरीवाल यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला होता. तसेच केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याची मागणी करणारी याचिका 28 मार्च रोजी उच्च न्यायालयाने फेटाळली होती. .