राज्यात आजपासून (१ एप्रिल) नवीन वीज दर लागू झाले आहेत. त्यानुसार महावितरणच्या सर्व ग्राहकांचा स्थिर आकार वाढणार आहे. त्यातच इंधन अधिभार जोडल्यावर सुमारे १० टक्के दरवाढीचा बोजा पडणार आहे.
वीज नियामक आयोगाच्या मार्च २०२३ च्या आदेशानुसार ही दरवाढ होणार आहे. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने मार्च २०२३ मध्ये दोन वर्षांसाठी दोन टप्प्यांत वीज दरवाढ मंजूर करण्यात आली होती. त्या अनुषंगाने ही वीज दरवाढ होत आहे. दरम्यान, १ एप्रिल २०२३ च्या तुलनेत १ एप्रिल २०२४ पासून सर्वच संवर्गांतील ग्राहकांचा स्थिर आकार वाढणार आहे.
असे असतील नवे दर
घरगुती संवर्गातील सिंगल फेजसाठी पूर्वी ११६ रुपये लागायचे. आता १ एप्रिल २०२४ पासून १२८ रुपये लागतील. थ्री फेजसाठी पूर्वीच्या ३८५ रुपयांऐवजी ४२५ रुपये लागणार आहेत. वाणिज्यिक ग्राहकांना पूर्वीच्या ४७० रुपयांऐवजी ५१७ रुपये, सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या ग्राहकांना शून्य ते २० किलोवॅटसाठी पूर्वीच्या ११७ रुपयांऐवजी १२९ रुपये, २० ते ४० किलोवॅटच्या ग्राहकाला १४२ रुपयांऐवजी १५६ रुपये, ४० किलोवॅटवरील ग्राहकाला पूर्वीच्या १७६ रुपयांऐवजी १९४ रुपये स्थिर आकार लागेल. कृषी ग्राहकांना (मीटर नसलले) ५ हॉर्स पॉवरपर्यंत पूर्वीच्या ४६६ रुपयांऐवजी ५६३ रुपये, लघु औद्योगिक ग्राहकांना २० किलोवॅटपर्यंत ५३० रुपयांऐवजी ५८३ रुपये स्थिर आकार लागेल. पथदिव्यांसाठी पूर्वीच्या १२९ रुपयांऐवजी आता १४२ रुपये, सरकारी कार्यालये व रुग्णालयांना २० किलोवॅटपर्यंत पूर्वीच्या ३८८ रुपयांऐवजी आता ४२७ रुपये स्थिर आकार पडणार आहे.