रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला (RBI) आज 90 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) मुंबईत मेळाव्याला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, दशकापूर्वी बँकिंग क्षेत्र खूप तणावात होते. पण आता बँकिंग व्यवस्था नफ्यात आहे आणि विक्रमी पातळीवर कर्ज देत आहे. भारतीय बँकिंग क्षेत्रातील बदल हा केस स्टडी आहे. केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये 3.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे जेणेकरून त्या बँकांचे पुनरुज्जीवन करता येईल.
UPI ला आता जगभरात ओळख मिळत आहे. आरबीआय मध्यवर्ती बँक डिजिटल चलनावरही काम करत आहे. पीएम मोदींनी सुलभ बँकिंग आणि कर्जाची सुलभ उपलब्धता यावरही भर दिला आहे. आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीबाबत ते म्हणाले की त्यांनी महागाई लक्ष्याबाबत चांगले काम केले आहे.
पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या 10 वर्षांत जे काही घडले ते केवळ ट्रेलर होता. आपल्याला देशाला अजून पुढे न्यायचे आहे आणि बरेच काही करायचे आहे. सध्या जे आरबीआयशी संबंधित आहेत त्यांना मी खूप भाग्यवान समजतो. आज तुम्ही बनवलेली धोरणे आणि तुम्ही करत असलेले काम RBI च्या पुढील दशकाची दिशा ठरवेल. हे दशक या संस्थेला शताब्दी वर्षापर्यंत घेऊन जाणारे दशक आहे आणि हे दशक विकसित भारताच्या संकल्प प्रवासासाठी तितकेच महत्त्वाचे आहे.
जेव्हा मी 2014 मध्ये रिझर्व्ह बँकेच्या 80 व्या वर्षाच्या कार्यक्रमाला आलो होतो, तेव्हा परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. भारतातील संपूर्ण बँकिंग क्षेत्र समस्या आणि आव्हानांना तोंड देत होते. एनपीएबाबत भारताच्या बँकिंग व्यवस्थेची स्थिरता आणि भवितव्य याबाबत प्रत्येकाच्या मनात भीती होती. बघा, आज भारताची बँकिंग व्यवस्था जगात एक मजबूत आणि टिकाऊ व्यवस्था म्हणून गणली जात आहे. एकेकाळी कोलमडण्याच्या मार्गावर असलेली बँकिंग व्यवस्था आता नफ्यात आली असून कर्ज देण्यामध्ये विक्रमी वाढ झाली आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.