भारत देश सध्या आत्मनिर्भरतेकडे मोठ्या वेगाने वाटचाल करत आहे. २०१४ नंतर संरक्षण क्षेत्रात भारताने आत्मनिर्भर होण्याकडे वाटचाल सुरु केली आहे. दरम्यान भारताच्या संरक्षण क्षेत्रातील निर्यातीमध्ये अभूतपूर्व वाढ झाली आहे असे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जाहीर केले. संरक्षण क्षेत्रात निर्यातीमध्ये भारताने २१,००० कोटी रुपयांचा टप्पा पार केल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एक्स या सोशल मीडिया हँडलवर याबाबत माहिती पोस्ट केली. यामध्ये ते म्हणजे, ”प्रत्येकाला हे सांगण्यास आनंद होत आहे की, भारताची संरक्षण क्षेत्रातील निर्यात खूप उंचीवर गेली आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच २१,००० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ३२.५ टक्क्यांनी निर्यात वाढली आहे.”
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पोस्ट केलेल्या माहितीनुसार, भारताच्या संरक्षण निर्यातीत २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात तब्बल २१,०८३ कोटी रुपयांची वाढ झाली आहे, जी मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ३२.५ टक्क्यांनी वाढली आहे. सध्या भारत तब्बल ८४ देशांमध्ये संरक्षण क्षेत्रातील निर्यात करत आहे. ही अभूतपूर्व वाढ भारताच्या संरक्षण उत्पादन क्षमतांना बळ देण्यासाठी आणि स्वदेशी संरक्षण उत्पादनाला चालना देण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हाती घेतलेले ठोस प्रयत्न आणि धोरणात्मक उपक्रम प्रतिबिंबित करते असे राजनाथ सिंह म्हणाले आहेत.