केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Niting Gadkari) यांनी मोठा संकल्प केला आहे. भारताला हरित अर्थव्यवस्था बनवण्याच्या त्यांच्या महत्त्वाकांक्षेचा एक भाग म्हणून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना हायब्रीड वाहनांवरील जीएसटी कमी करायचा आहे आणि त्यांनी 36 कोटींहून अधिक पेट्रोल आणि डिझेल वाहनांपासून देश पूर्णपणे मुक्त करण्याचे वचन दिले आहे.
भारताला पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्यांपासून पूर्णपणे मुक्त करणे शक्य आहे का, असे विचारले असता नितीन गडकरी म्हणाले, “100 टक्के, हे अवघड आहे पण अशक्य नाही. हे माझे मत आहे,” असे गडकरी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.
ते म्हणाले की, भारत इंधन आयातीवर 16 लाख कोटी रुपये खर्च करतो. हा पैसा शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी वापरला जाईल, गावे समृद्ध होतील आणि तरुणांना रोजगार मिळेल.
हायब्रीड वाहनांवरील जीएसटी कमी करून पाच टक्के आणि फ्लेक्स इंजिनवरील जीएसटी 12 टक्के करण्याचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे पाठवण्यात आला असून, या मागणीचा विचार केला जात आहे. तसंच जैवइंधनाच्या वापराला चालना देऊन देश इंधनाची आयात कमी करू शकतो यावर आमचा ठाम विश्वास असल्याचे नितीन गडकरी म्हणाले.
पुढे गडकारी म्हणाले की, ते 2004 पासून पर्यायी इंधनासाठी जोर देत आहेत. आणि येत्या पाच-सात वर्षात परिस्थिती बदलेल असा त्यांना विश्वास आहे. मी तुम्हाला या बदलाची कोणतीही तारीख आणि वर्ष सांगू शकत नाही कारण ते खूप कठीण आहे. हे अवघड आहे पण अशक्य नाही.