दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) तुरुंगात गेल्यानंतर राजकारण चांगलंच तापलं आहे. यादरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल (Sunita Kejriwal) पूर्ण ॲक्शनमध्ये आल्या आहेत. रामलीला मैदानातून राजकारणात उतरलेल्या सुनीता यांनी पहिल्यांदाच दिल्लीतील आमदारांच्या बैठकीला हजेरी लावली. तर आज (2 एप्रिल) आम आदमी पक्षाचे आमदार सुनीता केजरीवाल यांची भेट घेण्यासाठी सरकारी निवासस्थानी पोहोचले आहेत.
आपचे आमदार आणि सर्व मंत्री आज दुपारी सुनीता केजरीवाल यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यामुळे त्यांना दिल्लीचे पुढचे मुख्यमंत्री बनवण्याच्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. सूत्रांनी सांगितले की, पक्षाच्या 55 आमदारांनी सुनीता केजरीवाल यांची भेट घेतली आहे. दिल्लीत पक्षाचे एकूण 62 आमदार आहेत, त्यापैकी अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन हे न्यायालयीन कोठडीत आहेत, तर अन्य 4 आमदार सध्या दिल्लीबाहेर आहेत.
सुनीता केजरीवाल यांना भेटण्यासाठी आलेल्या मंत्र्यांमध्ये आतिशी मार्लेना, सौरभ भारद्वाज, गोपाल राय, इम्रान हुसेन, राज कुमार आनंद आणि कैलाश गेहलोत यांचा समावेश आहे. सोबतच आप आमदार प्रमिला टोकस, राजकुमारी ढिल्लन, भावना गौर आणि संजीव झा हेही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.
अरविंद केजरीवाल यांना त्यांची पत्नी सुनीता केजरीवाल यांना मुख्यमंत्री बनवायचे आहे, त्यामुळे त्यांनी जाणूनबुजून आतिशी मार्लेना आणि सौरभ भारद्वाज यांची नावे दारू घोटाळ्यात घेतल्याचा आरोप भाजपने केला आहे. सुनीता केजरीवाल यांचा राजकीय मार्ग मोकळा करण्याचा हा प्रयत्न असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे.
खरं तर, आज झालेल्या न्यायालयीन सुनावणीदरम्यान, अंमलबजावणी संचालनालयाने दावा केला आहे की अरविंद केजरीवाल यांनी कबूल केले आहे की विजय नायर यांनी त्यांना थेट अहवाल दिला नाही, तर त्यांच्या पक्षाच्या आतिशी मार्लेना आणि सौरभ भारद्वाज या दोन नेत्यांना दिला. अशा स्थितीत विजय नायर यांनी केजरीवाल यांच्याशी थेट संवाद साधला नाही, तर आतिशी मार्लेना आणि सौरभ भारद्वाज यांच्याशी चर्चा केली, हे सिद्ध झाल्यास प्रकरणांचा तपास या दोन नेत्यांकडे वळणार आहे. यामुळे अरविंद केजरीवाल यांना क्लीन चिट मिळणार नसली तरी आम आदमी पक्षाच्या या दोन नेत्यांची चौकशी होण्याची शक्यता नक्कीच बळावली आहे.