लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Elections) काँग्रेसने (Congress) त्यांच्या उमेदवारांची आणखी एक यादी (Candidates List) जाहीर केली आहे. काँग्रेसने उमेदवारांची 11वी यादी जाहीर केली आहे. यामध्ये 17 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. काँग्रेस पक्षाने माजी केंद्रीय मंत्री तारिक अन्वर, एमएम पल्लम राजू आणि आंध्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा वायएस शर्मिला रेड्डी यांच्या नावांची घोषणा केली आहे. या यादीत आंध्र प्रदेशातील पाच, बिहारमधील तीन, ओडिशातील आठ आणि पश्चिम बंगालमधील एका उमेदवाराच्या नावाचा समावेश आहे. (Congress Candidates List)
वायएस शर्मिला रेड्डी आंध्र प्रदेशातील कडप्पा येथून तर एमएम पल्लम राजू काकीनाडा येथून निवडणूक लढवणार आहेत. यादीत मोहम्मद जावेद यांना किशनगंजमधून आणि तारिक अन्वर यांना कटिहारमधून उमेदवारी देण्यात आली आहे.
पक्षाने पुन्हा एकदा अन्वर यांना बिहारमधील कटिहारमधून उमेदवार केले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा जेडीयू उमेदवार दुलालचंद गोस्वामी यांच्याकडून पराभव झाला होता. तर आता पुन्हा एकदा त्यांचा सामना गोस्वामी यांच्याशी होणार आहे. बिहारमधील किशनगंज लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने विद्यमान खासदार मोहम्मद जावेद यांना तिकीट दिले आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार अजित शर्मा यांना भागलपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
बिहारमध्ये लोकसभेच्या एकूण 40 जागांपैकी 9 जागांवर काँग्रेस निवडणूक लढवत आहे. त्याच वेळी, त्याचा मित्रपक्ष राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) 26 जागांवर निवडणूक लढवत आहे आणि डावे पक्ष पाच जागांवर निवडणूक लढवत आहेत. बिहारमध्ये आघाडी अंतर्गत काँग्रेसला किशनगंज, कटिहार, पटना साहिब, भागलपूर, सासाराम, मुझफ्फरपूर, समस्तीपूर, पश्चिम चंपारण आणि महाराजगंज या 9 जागा मिळाल्या आहेत.
https://twitter.com/INCIndia/status/1775092459204137364
माजी मनुष्यबळ विकास मंत्री पल्लम राजू यांना आंध्र प्रदेशातील काकीनाडा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. वायएस शर्मिला रेड्डी यांना आंध्र प्रदेशातील कडप्पा येथून तिकीट देण्यात आले आहे. कोरापुट, ओडिशाचे विद्यमान खासदार सप्तगिरी उलाका यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाने आतापर्यंत एकूण 214 उमेदवारांची घोषणा केली आहे.