लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Elections) आणि अबकारी धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांना अटक झाल्यानंतर आम आदमी पक्षाच्या (AAP) अडचणीत वाढ होताना दिसत आहे. मुख्यमंत्री केजरीवालांच्या अटकेनंतर ते राजीनामा देणार की तुरुंगातून दिल्ली सरकार चालवणार, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, आम आदमी पक्षाच्या आमदारांनी आज (2 एप्रिल) अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल (Sunita Kejriwal) यांची भेट घेतली.
आम आदमी पक्षाच्या (आप) आमदारांनी अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांची भेट घेतली आणि सांगितले की, अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री पद सोडू नये आणि त्यांनी तुरुंगातून सरकार चालवत राहावे. आप आमदारांनी सुनीता केजरीवाल यांना सांगितले की, दिल्लीतील दोन कोटी जनता मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभी आहे आणि त्यांनी कोणत्याही किंमतीत राजीनामा देऊ नये.
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, दिल्लीतील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत 62 पैकी 55 आपचे आमदार उपस्थित होते. आप नेत्यांनी सांगितले की, चार आमदार बाहेर आहेत तर तीन केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन तुरुंगात आहेत. त्याचबरोबर केजरीवाल यांना दारू धोरण घोटाळा प्रकरणात अटक झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपकडून सातत्याने केली जात आहे.