आता पुढील काही महिने हे लग्नसराईचे व सणासुदीचे आहेत. गुढीपाडवा, अक्षयतृतीया गणपती, नवरात्र , दिवाळी असे अनेक सण आपण साजरे करणार आहोत. आनंदाच्या व सणासुदीच्या काळात सोने खरेदीचे प्रमाण वाढते. त्यामुळे लग्नसराईच्या काळात सोन्याचे दर वाढतात ही गोष्ट नवीन नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा दर झपाट्याने वाढत आहे. कालदेखील सोन्याचा दर वाढलेला पाहायला मिळाला. ही परिस्थिती पाहून येत्या काही दिवसांत प्रति तोळा ७५ हजार रुपयांवर जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये चिंता वाढण्याची शक्यता आहे.
बाजार सुरु झाल्यावर सोन्याने उच्चांकी पातळी गाठली. काल सोन्याचा दर प्रतितोळा ६९ हजारांच्या वर जाऊन स्थिर झाला. जळगावमध्ये सोन्याचा प्रतितोळा दर जीएसटीसह 68700 रुपये इतका नोंदवण्यात आला. तर पुण्यात सोन्याच्या दराने प्रतितोळा ७०८४३ रुपयांचा स्तर गाठला.म्हणजेच अवघ्या चार ते पाच दिवसांत सोन्याचे दरात ४ ते ५ हजारांची वाढ झाली आहे. गुढीपाडवा हा सोने खरेदीसाठी शुभ मुहूर्त समजला जातो. ९ तारखेला गुढीपाडवा आहे. त्यामुळे सोन्याचा दर अजून वाढण्याची शक्यता आहे. ७० हजारांच्या आसपास असणारे सोन्याचा दर प्रतितोळा ७५ हजारांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे.