लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. सर्व पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. दरम्यान महाराष्ट्रात भाजपाने नागपुरातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना उमेदवारी दिली आहे. दरम्यान नितीन गडकरी यांनी आपल्या लोकसंवाद यात्रेच्या माध्यमातून दक्षिण-पश्चिम नागपूरमध्ये प्रचार केला. दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघ हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. विदर्भात उन्हाळा कडक होत असताना राजकीय प्रचार देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. आज प्रचारादरम्यान कडाक्याच्या उन्हाची चिंता न करता नागपूरचे दोन्ही दिग्गज नेते प्रचार करता दिसून आले.
दक्षिण-पश्चिम नागपूर हा फडणवीसांचा मतदार संघ असल्याने देवेंद्र फडणवीस देखील गडकरींच्या लोकसंवाद यात्रेत म्हणजेच प्रचारात सहभागी झाले. हा केवळ फडणवीसांचा मतदारसंघ नाही तर मागील निवडणुकीत येथील जनतेने गडकरींना ६५ हजारांपेक्षा जास्तीचे लीड दिले होते. यंदा देखील तेवढीच किंवा त्यापेक्षा जास्त लीड मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे. दक्षिण-पश्चिम नागपूर हा स्थानिक राजकारणात भाजपचा बालेकिल्ला समजला जातो.
असे असले तरी देखील नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस जनतेला साद घालण्यासाठी प्रचाराच्या मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. नितीन गडकरी आपल्या तिसऱ्या विजयासाठी मतदारांना साद घालत आहेत. यंदा नागपूरमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजपा अशा चुरशीचा सामना पाहायाला मिळणार आहे एवढे मात्र नक्की. तसेच नागपुर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असल्याने संघाची मदत देखील गडकरींना मिळेल असे चित्र सध्या दिसून येत आहे.