देशभरात केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. एनडीए आणि इंडी आघाडी निवडणुकीची जोरदार तयारी करताना दिसून येत आहे. भाजपाने ७ याद्यांच्या माध्यमातून आपले लोकसभा उमेदवार जाहीर केले आहेत. दरम्यान भाजपने महाराष्ट्रात आपले २४ उमेदवार जाहीर केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण ४८ लोकसभा मतदारसंघातील माहिती जाणून घेणार आहोत. त्यामध्ये आज आपण सोलापूर लोकसभा मतदार संघाविषयी जाणून घेणार आहोत. सोलापूरमध्ये मविआकडून काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे तर महायुतीकडून माळशिरसचे भाजपाचे आमदार राम सातपुते यांना लोकसभा उमेदवारी जाहीर करण्यात आलीये. सध्या सोलापूरमध्ये डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी हे भाजपाचे विद्यमान खासदार आहेत. २०१४ आणि २०१९ मध्ये मोदी लाटेत सुशीलकुमार शिंदेंना पराभवाचा सामना करावा लागला. तर आज सोलापूर लोकसभा मतदार संघात कोणाचे किती आमदार आहेत, पक्षीय बलाबल कसे आहे, तेथील जातीय समीकरणे कशी आहेत, याबद्दल थोडक्यात आढावा घेणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून, यंदा सोलापूरमध्ये हायव्होल्टेज आणि अटीतटीची निवडणूक पाहायला मिळणार आहे. काँग्रेसनं सलग तीनवेळा आमदार असणाऱ्या प्रणिती शिंदे यांना तर भाजपाने देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय आणि माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी दिलीये. त्यामुळे आता सोलापुरात खासदारकीसाठी आमदार विरुद्ध आमदार अशी लढत पाहायला मिळणार आहे. दरम्यान उमेदवारी जाहीर होताच दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसून येत आहेत. मध्यंतरी दोघांमध्ये लेटर वॉर झाल्याचे आपण पहिलेच असेल. मात्र तिथे नक्की ताकदवान कोण आहे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सोलापूर हा तसा काँग्रेसचा गड समजला जातो. मात्र २०१४ ला आलेल्या मोदी लाटेपासून हा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात राहिलेला आहे. त्यामुळे यंदा गमावलेला गड परत मिळविण्यासाठी तर विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी दोन्हीही पक्ष प्रयत्न करतील यात शन्का नाहीये. आता दोघांच्या राजकीय प्रवासाबद्दल जाणून घ्यायचे झाल्यास प्रणिती शिंद या माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत. जाई-जुई विचारमंच या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. २००९ मध्ये त्या पहिल्यांदा आमदार झाल्या. सलग तीन टर्म आमदार असल्याने मतदारसंघात त्यांची चांगली पकड असलेली पाहायला मिळतेय. प्रदेश काँग्रेसने कार्याध्यक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या सदस्यपदी संधी देऊन प्रणितींना चांगलेच बळ देखील दिले आहे. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणकीत काँग्रेसने आमदार प्रणिती शिंदेना रिंगणात निर्णय घेतला.
राम सातपुते हे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. तसेच भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. ऊसतोड कामगारांचा मुलगा ते आमदार असा त्यांचा प्रवास राहिलाय. राम सातपुते यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून आपल्या सामाजिक आणि राजकीय जीवनास सुरुवात केली. त्यानंतर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय अशी राम सातपुते यांची ओळख आहे.
राजकीय ताकद
आता सोलापुरात पक्षीय ताकद कशी आहे ते देखील आपण जाणून घेऊयात. सोलापूर लोकसभा मतदार संघ हा ६ विधानसभा मतदारसंघात विभागला गेला आहे. यातील अक्कलकोट, सोलापूर दक्षिण, सोलापूर उत्तर, पंढरपूर या मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. तर मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने आणि ज्येष्ठ नेते राजन पाटील हे अजित पवार गटात गेल्याने महायुतीची ताकद भक्कम झाली आहे.
कसे आहे जातीय समीकरण?
सोलापूर लोकसभा मतदारसंघात मराठा आणि लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात आहे. शिवाय मुस्लिम, मागासवर्गीय, पदमशाली समाजाची मते देखील या निवडणुकीत महत्वाची ठरणार आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपने धार्मिक कार्ड वापरत लिंगायत धर्मगुरू असलेल्या डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना उमेदवारी दिली. त्यात वंचित-एमआयएम युतीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर होते, त्यामुळे मागासवर्गीय आणि मुस्लिम मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन झाले. ज्याचा थेट फटका सुशीलकुमार शिंदेना बसला होता. यंदाच्या निवडणुकीत प्रणिती शिंदेपुढे मतांचे हे विभाजन थांबवण्याचे मोठे आव्हान असणार आहे. तर राम सातपुते यांना देखील विजयासाठी अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे देखील तितकेच खरं आहे.
सोलापुरी चादर ही जगप्रसिद्ध आहे. मात्र सध्या त्या उद्योगामध्ये काही प्रमाणात मंदीचे वातावरण आहे. बिडी कामगारांचे प्रश्न अजून जैसे थे असेच आहेत. गिरणगाव म्हणून ओळख असणाऱ्या याच सोलापूरमध्ये अनेक मोठ्या मिल्स बकाल आणि बंद अवस्थेत असून, रोजगाराच्या संधी नसल्याने युवक मोठ्या प्रमाणात मुंबई,पुणे आणि हैद्राबाद या शहरात स्थलांतरित होत आहेत. उडाण योजनेत निवड झाली असली तरी तांत्रिक कारणाने सोलापूरची विमानसेवा अजूनही बंदच आहे. पाणीप्रश्न जटिल आहे. त्यामुळे हे सर्व प्रश्न सोडवणारा खासदार येथील जनतेला हवा आहे. त्यामुळे कोण विजयी होणार हे आताच सांगणे कठीण असले तरी ही निवडणूक अत्यंत अटीतटीची आणि हायव्होल्टेज होणार एवढे मात्र नक्की.