येत्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये महत्वपूर्ण घडामोडी घडत आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून उदय सामंत यांचे बंधू आणि शिवसेनेचे नेते किरण सामंत यांनी माघार घेतल्याच्या चर्चेला सुरवात झाली आहे पंतप्रधानपदी पुन्हा एकदा मोदी विराजमान व्हावेत यासाठी एक सोशल मीडियावर पोस्ट करत किरण सामंत यांनी या चर्चेला कारण दिले आहे. किरण सामंत यांनी जर खरंच माघार घेतली असेल तर नारायण राणेंचा मार्ग मोकळा झाला आहे अशीही चर्चा रंगली आहे. कोकणात रात्रीपासून ही पोस्ट व्हायरल झाली असली तरी मात्र अधिकृतरित्या याबाबत किरण सामंत यांनी माध्यमांसमोर येऊन माहिती दिलेली नाही.त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.
“नरेंद्र मोदीजी पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी व अब की बार ४०० पारसाठी रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघातून किरण सामंत यांची माघार ” -किरण सामंत. असा दोन ओळींचा संदेश या पोस्टमध्ये किरण सामंत यांनी लिहिला आहे.ही पोस्ट फेसबुकवर किरण सामंत यांनी आज सकाळी टाकली. त्यानंतर काही वेळाने ही पोस्ट डिलीट केली. परंतु किरण सांमत यांनी व्हॉट्सअॅप ग्रुपवर ही पोस्ट कायम ठेवली. ती मात्र डिलिट केलेली नाही अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.
रत्नागिरी सिंधुदुर्गात किरण सामंत यांचा दबदबा आहे. मागच्या वर्षभरापासून लोकसभेसाठी किरण सामंत यांनाच उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती. त्याच अपेक्षेने सगळे कार्यकर्ते कामही करत होते. मात्र आता सगळ्यांसाठी किरण सामंत यांची ही व्हायरल झालेली पोस्ट म्हणजे धक्का मानली जाते आहे.
सिंधुदुर्ग- रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार नारायण राणे असणार आहे. त्यांची उमेदवारी आज घोषीत होण्याची शक्यता आहे.
मात्र या मतदारसंघावर शिंदे गटाच्या किरण सामंत यांच्याकडून दावा केला जात होता तर भाजपकडून नारायण राणे यांच्या नावाची चर्चा केली जात होती. मात्र आता किरण सामंत यांच्या पोस्टमुळे महायुतीतला हा तिढा सुटल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.