लोकसभेच्या पार्श्वभूमीवर एकूण ५५ खासदारांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपला आहे. यामध्ये मंगळवारी ४९, तर बुधवारी पाच खासदार निवृत्त झाले आहेत. राज्यसभेतून सध्या शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया, राजीव चंद्रशेखर, पशुपालन आणि मत्स्य मंत्री पुरुषोत्तम रुपाला, विदेश राज्यमंत्री वी मुरलीधरण, सूक्ष्म आणि लघु मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे, माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री एल मुरुगन, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव हे सदस्य निवृत्त होतील. यामध्ये एल. मुरुगन आणि अश्विनी वैष्णव सोडून सर्व मंत्री लोकसभा लढणार आहेत.
तब्बल ३३ वर्षांच्या संसदेतील कारकीर्दीनंतर देशाचे माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग हेही राज्यसभेतून निवृत्त झाले आहेत. ३ एप्रिल रोजी त्यांचा सभागृहातील कार्यकाळ संपला आहे . मनमोहन सिंह १९९१ मध्ये पहिल्यांदा राज्यसभेवर पोहोचले होते. भारतीय अर्थव्यवस्थेला दिशा देण्याचे महत्वपूर्ण काम त्यांनी केले.
मनमोहन सिंग यांची कारकीर्द
निवृत्त राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ आणि नोकरशहा, अशा विविध क्षेत्रांत त्यांनी काम केले. भारताचे १४ वे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे एक विचारवंत व अभ्यासक म्हणून ओळखले जातात. त्यांचा कामाप्रती असलेला व्यासंगी व शैक्षणिक दृष्टिकोन, जनसामान्यांसाठी असलेली उपलब्धता व विनम्र आचरणामुळे त्यांच्याकडे आदराने बघितले जाते. १९७२ मध्ये त्यांची अर्थमंत्रालयात प्रमुख आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती झाली. डॉ. सिंग यांनी अर्थमंत्रालयात भूषविलेल्या अनेक महत्वाच्या पदांमध्ये अर्थ मंत्रालयाचे सचिवपद, नियोजन आयोगाचे उपाध्यक्षपद, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे प्रमुख आर्थिक सल्लागार व विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्षपद आदी पदांचा समावेश होतो.
माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्र्यांची जबाबदारी सांभाळली होती. या काळातच अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणाचा निर्णय घेण्यात आला. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हा निर्णय निर्णायक ठरला. मनमोहन सिंग हे २००४ ते २०१४ या काळात देशाचे पंतप्रधान देखील राहिले आहेत. मनमोहन सिंग सध्या ९१ वर्षांचे आहेत. त्याआधी १९९१-९६ या कालावधीत डॉ. सिंग यांनी भारताचे अर्थ मंत्रिपद भूषविले. भारताच्या आर्थिक सुधारणा अमलात आणण्यासाठी आवश्यक असलेले सर्वंकष धोरण तयार करण्यात सिंग यांची भूमिका जगभरात नावाजली जाते.
सोनिया गांधी पहिल्यांदाच राज्यसभेवर
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी या पहिल्यांदाच राज्यसभेवर जात आहेत. यापूर्वी त्या रायबरेली या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवायच्या, पण यावेळी त्यांनी लोकसभेची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आरजेडीचे प्रकाश झा, समाजवादी पार्टीच्या जया बच्चन हेही पुन्हा राज्यसभेवर जाणार आहेत. काँग्रेसने नसीर हुसैन यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवले आहे.