मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तसेच ते दिल्लीला देखील गेले होते, तिथे त्यांनी अनेक नेत्यांसोबत चर्चा केली. त्यामुळे एकनाथ खडसे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. याबाबत आता खडसेंनी स्वत: स्पष्टीकरण दिलं आहे.
भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांवर एकनाथ खडसेंनी स्पष्टीकरण देत त्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. एकनाथ खडसे म्हणाले की, या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाहीये. मी दिल्लीला वैयक्तिक कामासाठी गेलो होतो. दिल्लीमध्ये गेल्यानंतर अनेक नेत्यांशी भेटीगाठी होत असतात. पण काल अशा काही भेटीगाठी झाल्या नाहीत. त्यामुळे मी भाजपमध्ये जात असल्याच्या चर्चांना काहीही तथ्य नाही.
असा काही निर्णय व्हायचा असेल तर तो विचार करून घ्यायचा असतो. पक्षाशी, नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी बोलून याबाबतचा निर्णय घ्यायचा असतो. कारण हा अतिशय महत्त्वाचा निर्णय राहणार आहे. ज्यावेळी असा निर्णय मी घेईन त्यावेळी आपण स्वत:हून माध्यमांना माहिती देईन, असेही एकनाथ खडसेंनी सांगितले.
भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे हे भाजपमध्ये येण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं म्हटलं होतं. यावर उत्तर देताना खडसे म्हणाले की, मला भाजपमध्ये येण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज नाही. जर मला भाजपमध्ये यायचं असेल तर वरिष्ठ पातळीवर नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासोबत माझे चांगले संबंध आहेत. त्यामुळे मला भाजपमध्ये येण्यासाठी इतरांना विचारण्याची गरज नाही.