नेपाळ पोलिसांनी माओवादी नेता काली बहादूर खाम(Kali Bahadur Kham) याला 15 वर्षांपूर्वी घडलेल्या एका खून प्रकरणात काल मध्यरात्री काठमांडूमधील गोंगबू येथून अटक केली आहे. त्याच्यावर 2009 मध्ये चितवन येथील माओवादी कॅम्पमध्ये एका व्यावसायिकाचे अपहरण करून हत्या केल्याचा आरोप आहे.
खाम हे पंतप्रधान पुष्प कमल दहल उर्फ प्रचंड (Pushpa Kamal Dahal ) यांचे निकटवर्तीय मानले जातात. खाम यांना माओवाद्यांशी एकनिष्ठ असलेला काठमांडूचा व्यापारी रामहरी श्रेष्ठ यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. चितवन येथील माओवादी लढाऊ छावणीत श्रेष्ठ यांचे अपहरण, छळ करून हत्या केल्याच्या आरोपावरून त्याच्यावर न्यायालयात खटला सुरू आहे.
पकडण्यात आलेल्या काली बहादूर खाम याला आज चितवन जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती काठमांडूचे पोलीस अधीक्षक नवराज अधिकारी यांनी दिली. CPN (MC) चे केंद्रीय सदस्य असण्याव्यतिरिक्त, पक्षाकडून प्रचंड यांच्या सुरक्षेची जबाबदारी खाम यांच्याकडे आहे. बेकायदेशीर शस्त्रे बाळगल्याच्या आरोपावरून खाम याच्याविरुद्ध काठमांडू न्यायालयात खटला प्रलंबित आहे. पोलिसांनी त्याच्या घरातून एके-47 रायफल आणि इतर अनेक विदेशी पिस्तुले जप्त केली आहेत.
2009 मध्ये व्यापारी श्रेष्ठ यांचे काठमांडू येथील कोटेश्वर येथील घरातून अपहरण करून चितवन येथील माओवादी छावणीत नेऊन त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यावेळी काली बहादूर खाम हा माओवादी कॅम्पचा डिव्हिजन कमांडर होता.