लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपाने आपले अनेक जागांवर लोकसभेचे उमेदवार जाहीर केले आहेत. महाराष्ट्रात देखील भाजपाईं २४ जागांवर आपले उमेदवार दिले आहेत. त्यातून जळगावमधून स्मिता वाघ यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी नाराज होत आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये उन्मेष पाटलांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने अनेक विद्यमान खासदारांचा पत्ता कट केला आहे. दरम्यान त्यात जळगावच्या विद्यमान खासदारांचा देखील समावेश आहे. दरम्यान उन्मेष पाटलांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरेंनी भाजपावर टीका केली आहे. वापर आणि फेक अशी वृत्ती असलेल्या भाजपचा पराभव आपल्याला करायचा आहे. उन्मेष पाटलांनी प्रवाहाच्या विरुद्ध उडी मारली आहे. तुमचे आमचे विचार एक आहेत. आपली फसगत करणाऱ्यांना निवडून द्यायचे नाही असे ठाकरे म्हणाले.
दरम्यान खासदार उन्मेष पाटील हे नाराज असल्याच्या चर्चा होत्या. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील फोनवरून त्यांची समजूत काढण्याचा निर्णय घेतला होता. तसेच पाटील वेगळा विचार करतील असे वाटत नसल्याचे जळगावच्या उमेदवार स्मिता वाघ म्हणाल्या होत्या. मात्र अखेर खासदार उन्मेष पाटलांनी ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला आहे.