आगामी लोकसभा निवडणुकीत (Loksabha Elections) काँग्रेसला (Congress) आणखी एक मोठा धक्का बसला आहे. बॉक्सिंगमधील भारताचा पहिला ऑलिम्पिक पदक विजेते आणि काँग्रेस नेते विजेंदर सिंग (Vijender Singh) यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे.
विजेंदर सिंग यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. विजेंदर सिंग यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अशा स्थितीत भाजप त्यांना कोठून उमेदवारी देणार हे पाहावे लागणार आहे.
विजेंदर सिंग अनेकदा त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून भाजपविरोधात बोलत होते. शेतकऱ्यांच्या आंदोलनालाही त्यांनी पाठिंबा दिला होता. तर काही काळापूर्वी ते आम आदमी पार्टीत प्रवेश करणार असल्याचीही चर्चा होती. मात्र त्यांनी आता भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेऊन सर्वांनाच चकित केले आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर विजेंदर सिंग म्हणाले की, देशाच्या विकासासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी मी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
2019 ची लोकसभा निवडणूक विजेंदर सिंग यांनी दक्षिण दिल्ली मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून लढवली होती, पण तिथे त्यांचा पराभव झाला होता. तर गेल्या काही दिवसांपासून त्यांचे नाव मथुरा येथून पक्षाचे उमेदवार म्हणून चर्चेत होते, जिथून अभिनेत्री आणि विद्यमान खासदार हेमा मालिनी पुन्हा निवडणूक लढवत आहेत.
दरम्यान, 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून बॉक्सर विजेंदर सिंग यांनी इतिहास रचला होता. या खेळामध्ये पदक जिंकणारे ते पहिले भारतीय बॉक्सर होते. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारे विजेंदर हे दुसरे भारतीय खेळाडू होते. तर 2009 मध्ये त्यांना खेलरत्नने सन्मानित करण्यात आले होते.