केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. ७ टप्प्यांमध्ये मतदान होणार असून, ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान देशभरात भाजपा म्हणजेच एनडीए आणि इंडी आघाडीने आपापले उमेदवार जाहीर केले आहेत. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी इंडी आघाडीवर टीका केली आहे. इंडी आघाडी लोकसभा निवडणुकीत एनडीए किंवा भाजपाचा मुकाबला करू शकत नाही असे राजनाथ सिंह म्हणाले आहेत.
राजनाथ सिंह यांनी आज गाझियाबादमध्ये प्रचार सभा घेतली. राजनाथ सिंह यांनी विद्यमान आमदार आणि लोकसभेचे उमेदवार अतुल गर्ग यांचा प्रचार सभेत ते बोलत होते. विरोधकांना लोकसभा निवडणुकीत एनडीएला सामोरे जाण्यासाठी संघर्ष करावा लागेल असे सिंह म्हणाले. ”भाजपाशी लढण्यासाठी आणि पराभूत करण्यासाठी अनेक विरोधी पक्ष एकत्रित आले आहेत. मात्र आपल्या स्वार्थासाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी युती केली आहे. हे तुम्ही जाणताच. मात्र ते एनडीएला सामोरे जाऊ शकत नाहीत.” या देशातील जनता यांचे मोये मोये करून टाकेल. (निवडणुकीत जनताच विरोधी पक्षाला धडा शिकवेल), असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले.
भाजपाने लोकसभेसाठी आपल्या ७ याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. यंदाच्या निवडणुकीत काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर अनेक विद्यमान खासदारांचे तिकीट कापण्यात आले आहे. तर भाजपा ३७० ते एनडीए ४०० पार असा नारा पंतप्रधान मोदी आणि भाजपाने दिला आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत जनता कोणाला मोठ्या प्रमाणात साथ देणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.