लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर महायुतीचे अकोल्यातील उमेदवार अनुप धोत्रे (Anup Dhotre) यांच्या प्रचारासाठी आज (3 एप्रिल) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची सभा पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सत्ता पुन्हा आली पाहिजे, असे म्हटले. तसंच यावेळी त्यांनी भाषणात पवार साहेबांचा देखील उल्लेख केला, त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विरोधक नरेंद्र मोदीजींना पंतप्रधान करण्यास नकार देत असतील तर मग तुम्ही सांगा तुम्हाला पंतप्रधान म्हणून कोण हवं आहे? या देशाचा विकास कोण करू शकतं? असा सवाल फडणवीसांनी विचारला. तसंच आपल्या देशात पुन्हा पंतप्रधान मोदींची सत्ता आली पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले.
पुढे ते म्हणाले, पंतप्रधान मोदींनी फक्त देशातच नाही तर वैश्विक स्तरावर आपली प्रतिमा निर्माण केली आहे. आज पाकिस्तान आणि चीन हे देश भारताकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाहीत, असा मजबूत भारत पंतप्रधान मोदींनी निर्माण केला आहे. तसंच कालपर्यंत प्रगत देशांना जे जमत होतं ते भारतालाही जमू लागलं आहे. आज आपलं यान चंद्रावर उतरलं आहे. आपण सूर्यालाही गवसणी घातली आहे. पंतप्रधान मोदींनी भारताला या स्तरावर नेऊन ठेवलं आहे. त्यामुळे आपल्याला पंतप्रधान मोदींच्या बाजूने उभे राहायचे आहे.
आपल्या अनुपला दिल्लीला पाठवा. अनुप दिल्लीमध्ये आला तर आम्ही सगळे त्याच्या पाठिशी आहोत. आमचे शिंदे साहेब असतील, आमचे पवार साहेब असतील, आम्ही सगळे त्याच्या पाठिशी आहोत. पण, पवार साहेब म्हणजे कन्फ्युजन नको, पवार साहेब म्हणजे अजितदादा, असं देवेंद्र फडणीवस मिश्किलपणे म्हणाले. त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.