लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस मध्ये नाराजीनाट्य सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. वायव्य लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाच्या हातात गेल्याने काँग्रेसचे नेते संजय निरुपम हे नाराज आहेत. निरूपण हे सातत्याने काँग्रेसच्या भूमिकेवर टीका करताना दिसत आहेत. यासर्व गोष्टींमुळे काँग्रेस पक्षाने देखील संजय निरुपम यांच्यावर कारवाईचा बडगा उभारला आहे. काँग्रेसच्या धोरणांवर टीका करत असल्याने निरुपम यांच्यावर पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत.
संजय निरुपम यांचे लोकसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारक म्हणून निवडण्यात आलेले नाव आम्ही रद्द केल्याचे पटोलेंनी सांगितले. आज त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. नाना पटोले मुंबईत माध्यमांशी बोलत होते. यामुळे संजय निरुपम काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष होते. निरुपम यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमधील मजकूर पाहिल्यानंतर ते काँग्रेस पक्षात राहतील असे वाटत नाहीये. मात्र काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर निरुपम कोणत्या पक्षात जाणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. यामध्ये मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी आणि अशोक चव्हाण यांचा समावेश आहे. माजी खासदार प्रिया दत्त देखील शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरु आहेत. सोडून चाललेय काँग्रेस नेत्यांमध्ये आता संजय निरुपम यांच्या नावाची भर पडण्याची शक्यता आहे. मात्र काँग्रेस सोडल्यानंतर ते कोणत्या पक्षात जाणार हे पाहावे लागेल किंवा ते कोणती भूमिका घेतात हे देखील पाहावे लागेल.