लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. महायुतीकडून हिंगोलीत शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र आता हेमंत पाटील यांची उमेदवारी शिवसेनेकडून रद्द करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी हिंगोली लोकसभेचा उमेदवार बदलला आहे. तर यवतमाळ वाशिममधून भावना गवळी यांचा पत्ता कट झाला आहे. यवतमाळ वाशिममध्ये हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निर्णयानंतर भावना गवळी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान खासदार भावना गवळी यांनी या निर्णयानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
भावना गवळी या आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी मुंबईत तळ ठोकून बसल्या होत्या. यावेळी प्रतीक्रिया देताना भावना गवळी म्हणाल्या, ”मी यवतमाळ-वाशीम मतदारसंघावरील दावेदारी अद्याप सोडलेली नाही. मी आता माझ्या मतदारसंघात परत जात आहे. मी माझ्या मतदारसंघातून अर्ज भरणार आहे.” भावना गवळी यांनी ही प्रतिक्रिया एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. कदाचित भावना गवळी या अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. असे झाल्यास यवतमाळ वाशिममध्ये महायुतीला मोठी अडचण निर्माण होऊ शकते.
यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातून शिवसेना खासदार भावना गवळी या इच्छुकी होत्या. मात्र आता त्यांचा देखील पत्ता आता कट करण्यात आला आहे. यवतमाळ-वाशीममध्ये संजय राठोड यांचे नाव चर्चेत होते. मात्र या ठिकाणी हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे भावना गवळी यांचा पत्ता देखील कट झाला आहे. आपल्याला तिकीट मिळावे यासाठी भावना गवळीने सर्वस्व पणाला लावले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वर्ष बंगल्यावर त्यांनी भेट घेतली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील त्यांनी भेट घेतली होती. मात्र फडणवीसांच्या भेटीनंतर त्यांचा नूर पूर्णपणे बदलला होता. तेव्हाच कदाचित त्यांना तिकीट मिळणार नाही हे स्पष्ट झाले होते.