लोकसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाला लागलेली गळती थांबण्याचे चिन्ह दिसत नाहीयेत, उलट दिवसागणिक काँग्रेसला लागलेले ग्रहण वाढत असलेले दिसत आहे. आज काँग्रेसमधले नेते राजीनामा देत बाहेरचा रस्ता धरत असल्याचे दिसत आहे. काल बॉक्सर विजेंदर सिंह यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. आज काँग्रेसमधले जेष्ठ नेते गौरव वल्लभ यांनी पक्षाध्यक्षांकडे आपला राजीनामा सोपवत स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली आहे.
गौरव वल्लभ यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या कडे आपला राजीनामा आणि त्याबरोबर पत्र दिले आहे. त्यामागचे कारण एक्स वर पोस्ट करत स्पष्ट केले आहे. त्यांनी आपल्या पत्रात असे म्हंटले आहे की,
“पक्षाच्या ग्राऊंड लेवल कनेक्ट पूर्णपणे तुटला आहे. मी भावनिक आहे. मन व्यथित आहे. मला खूप काही सांगायचे आहे. मला लिहायचे आहे. परंतु माझी मूल्ये मला इतरांना दुखावतील असे काहीही बोलण्यास मनाई करतात. तरीही, आज मी माझे मत तुमच्यासमोर मांडत आहे, कारण मला वाटते की सत्य लपवणे हा देखील गुन्हा आहे आणि मला या गुन्ह्याचा भाग व्हायचे नाही.
‘मी अर्थशास्त्राचा प्राध्यापक आहे. पक्षाने मला राष्ट्रीय प्रवक्ता बनवले तेव्हा मी माझे मत ठामपणे मांडले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पक्षाच्या भूमिकेमुळे मी अस्वस्थ होतो. मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा मला वाटले की हा देशातील सर्वात जुना पक्ष आहे. येथे तरुण, बुद्धिजीवी लोकांच्या विचारांना महत्त्व दिले जाते.मात्र आज काँग्रेस पक्ष ज्या दिशाहीन वाटेने पुढे जात आहे, अश्या परिस्थितीत मला काय करावे ते सुचत नाहीये . मी सनातन विरोधी घोषणा देऊ शकत नाही किंवा सकाळ संध्याकाळ देशाची संपत्ती निर्माण करणाऱ्यांना शिवीगाळ करू शकत नाही. म्हणूनच मी सर्व पदांवरून आणि काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरून. राजीनामा देत आहे “.
पक्षाची वाटचाल चुकीच्या दिशेने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. एकीकडे आपण जातीवर आधारित जनगणनेबद्दल बोलतो आणि दुसरीकडे संपूर्ण हिंदू समाजाचा विरोध होताना दिसत आहे. या कार्यशैलीमुळे पक्षाच्या लोकांमध्ये विशिष्ट धर्माचे समर्थक असल्याची प्रतिमा निर्माण होते, असे गौरव वल्लभ म्हणाले आहेत .
कॉँग्रेसने अयोध्या राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापासून स्वत:ला दुर ठेवले, यावर देखील गौरव वल्लभ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, मी जन्माने हिंदू आहे आणि व्यवसायाने शिक्षक आहे. मात्र पक्षाच्या या भूमिकेने मला अस्वस्थ केले. पक्ष आणि आघाडीशी संबंधित अनेक लोक सनातनच्या विरोधात बोलतात आणि त्यावर पक्ष गप्प बसतो. एक प्रकारे, मौन संमती देण्यासारखे आहे.
माध्यमात पक्षाची बाजू भक्कमपणे मांडणारे काँग्रेस प्रवक्ते अशी गौरव वल्लभ यांची ओळख सांगितली जात होती.मात्र कॉँग्रेस पक्षामधला वाढता गोंधळ, राहुल गांधीची बिनबुडाची वक्तव्य पक्षाला दिशाहीन नेतृत्वाकडे घेऊन जात आहेत हे मात्र नक्की,. त्यामुळे गौरव वल्लभ यांच्यासारखे नेत्याना असे निर्णय घेणे भाग पडत आहे.