लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha elections 2024) पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. आज (4 एप्रिल) वर्धेत महायुतीचे उमेदवार खासदार रामदास तडस यांचे नामांकन दाखल केल्यानंतर अनेकांत स्वाध्याय मंदिरात आयोजित केलेल्या सभेत देवेंद्र फडणवीसांनी हजेरी लावली होती. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित होते. तर आयोजित सभेला संबोधित करताना फडणवीस म्हणाले की, यावेळी मोदींच्या 400 पारच्या स्वप्नाला महिला बळ देतील.
मोदी सरकारने दहा वर्षे केलेली कामे ‘ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है’ असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी देशातील सर्व महिला मोदींच्या 400 पारच्या स्वप्नाला बळ देतील आणि देशाच्या विकासात खांद्याला खांदा लावून काम करतील. कारण येणाऱ्या 2029 च्या निवडणुकीमध्ये 33 टक्के महिला खासदार आणि आमदार असतील, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
विरोधकांवर हल्लाबोल करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मोदींची सुसाट असलेली रेल्वे रोखण्याकरिता देशातील विविध राजकीय पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली आहे. यामध्ये असलेले नेते हे या रेल्वेचे इंजिन आहेत. या रेल्वेमध्ये फक्त इंजिन असून त्यात डब्बे नसल्याने ती कोणत्या दिशेने धावेल हे काही सांगता येत नाही. उलट महायुतीच्या रेल्वेचं इंजिन हे नरेंद्र मोदी आहेत. या रेल्वेच्या डब्यात सर्वसामान्य बसलेले असल्याने ती विकासाच्या रूळावर धावणारी आहे.
नरेंद्र मोदींनी विदेशात भारताचे नावलौकिक केले आहे. पूर्वी मोदींची फक्त लाट होती आता त्सुनामी आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.