अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नवनीत कौर यांच्या अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र बोगस ठरवणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. या सुनावणीत राणांना दिलासा मिळाला असून त्यांच्या जात प्रमाणपत्रावर सर्वोच्च शिक्कामोर्तब झाला आहे. याप्रकरणी न्यायमूर्ती जे. के. महेश्वरी आणि करोल यांच्या खंडपीठानं निकाल दिला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निर्णय दिला होता. पण आता सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाचा निर्णय बदलला असून नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र वैध ठरवलं आहे. त्यामुळे आता राणांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
2021 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवलं होतं. त्यानंतर नवनीत राणांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तर याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली त्यावेळी न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती दिली होती. तसंच बोगस जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणाचा दोन्ही गटाचा युक्तीवाद 28 फेब्रुवारीला पूर्ण झाला. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता. तर न्यायालयाने याप्रकरणी आज अंतिम निकाल जाहीर केला आहे.