लोकसभेच्या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या राजकारणात नवीन ट्विस्ट बघायला मिळत आहे. अमरावती लोकसभा निवडणुकीतून आनंदराज आंबेडकरांनी(Anandraj Ambedkar) माघार घेतली असल्याचे वृत्त समोर आले आहे. रिपब्लिकन सेनेचे (Republican Sena)अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी यासंदर्भात एक पत्रक जारी केले असून याच पत्रकातून त्यांनी वंचितला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू,बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे लहान बंधू आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत २ जानेवारी रोजी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.आपण पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरलो असून सर्वांच्या विकासासाठी आपण काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.आनंदराज आंबेडकर हे गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने अमरावतीचा दौरा करीत आहेत. आपण अमरावतीतून निवडणूक लढवावी, अशी स्थानिक कार्यकर्त्यांची इच्छा होती, असे त्यांनी निवडणुकीचा अर्ज भरताना सांगितले होते.
वंचितने उमेदवार दिला असतानाही आनंदराज आंबेडकरांनी अमरावतीमध्ये रिपब्लिक सेनेच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र आता त्यांनी वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा दिला असून मतांचं विभाजन टाळण्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे सांगितले आहे. .
वंचित बहुजन आघाडीकडे आनंदराज यांनी पाठिंब्यासाठी मागणी केली होती, परंतु वंचितने पाठिंबा न दिल्याने आनंदराज आंबेडकर यांनी माघार घेतली. मात्र, तरीही भाजप निवडून येऊ नये, यासाठी वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याची माहिती आनंदराज आंबेडकर यांनी एका पत्रातून दिली आहे.