यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2024) मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) अजूनही विजयाचे खाते खोलता आलेले नाहीये. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा सलग तीन वेळा पराभव झाला आहे. ताज्या पॉइंट टेबलमध्ये मुंबई इंडियन्स संघ शेवटच्या स्थानावर आहे. त्यामुळे मुंबईच्या चाहत्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. अशातच आता मुंबई इंडियन्ससाठी एक दिलासा देणारी बातमी आली आहे.
लवकरच मुंबई इंडियन्समध्ये स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) एन्ट्री होणार आहे. सूर्यकुमार यादव पुढील सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
क्रिकबजच्या अहवालात असे म्हटले आहे की, सूर्यकुमार यादवला एनसीएने मान्यता दिली आहे. आता तो त्याच्या संघात सामील होऊ शकतो आणि आयपीएलमध्ये खेळू शकतो. त्यामुळे आता सूर्या आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.
सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे काही काळ मैदानातून बाहेर होता. तो डिसेंबर 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरद्ध तिसऱ्या टी-20 मध्ये शेवटचा क्रिकेट खेळला होता. तर दुखापतीनंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तर आता येत्या शुक्रवारी (5 एप्रिल) सूर्यकुमार संघात दिसणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सला मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आता सूर्याच्या एन्ट्रीने मुंबई येत्या सामन्यात विजयाचे खाते खोलणार की नाही? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.