आज (4 एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) बिहारच्या (Bihar) दौऱ्यावर आहेत. जमुई येथील सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान म्हणाले, ही निवडणूक विकसित बिहारचे स्वप्न पूर्ण करण्याची निवडणूक आहे.
एका बाजूला काँग्रेस (Congress) आणि आरजेडीसारखे (RJD) पक्ष आहेत ज्यांनी आपल्या सरकारच्या काळात संपूर्ण जगात देशाचे नाव कलंकित केले होते, तर दुसरीकडे भाजप आणि एनडीए आहेत, ज्यांचे एकमेव ध्येय आहे विकसित भारत घडवणे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पुढे ते म्हणाले, संपूर्ण बिहार म्हणत आहे पुन्हा एकदा एनडीए सरकार. माझा धाकटा भाऊ चिराग पासवान रामविलास जी यांचा विचार पूर्ण गांभीर्याने पुढे नेत आहे याचे मला समाधान आहे. बिहारची भूमी संपूर्ण देशाला दिशा दाखवत आहे. तसंच ही जाहीर सभा नसून विजयी सभा आहे. बिहारमधील 40 जागा एनडीएला दिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांना सलाम करतो, असे पंतप्रधान म्हणाले.
10 वर्षात जे काही झालं ते फक्त ट्रेलर आहे, अजून खूप काम करायचं आहे. आपल्याला बिहार आणि देशाला खूप पुढे न्यायचे आहे. गरिबीची झळ सोसून हा मोदी इथपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळेच मला प्रत्येक गरिबीची वेदना कळते आणि जाणवते. तुमचे स्वप्न हाच माझा संकल्प आहे ही मोदींची हमी आहे. त्यामुळे केंद्र सरकारने गरीब कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. बिहारमधील गरिबांना 37 लाख पक्की घरे मिळाली आहेत. नऊ कोटी लोकांना मोफत रेशन मिळाले आहे आणि ते पुढील पाच वर्षे मिळत राहील, अशी मोदींची हमी आहे, असेही पंतप्रधा मोदी म्हणाले.