कोल्हापूरमधील करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवी देशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. अंबाबाई देवीच्या मूर्ती संवर्धनाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. मूर्ती संवर्धननांतर तज्ज्ञ समितीने एक ८ ते १० दहा पानी अहवाल न्यायालयात सादर केला आहे. काही दिवसांपूर्वी तज्ज्ञ समितीने श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीची पाहणी केली होती. न्यायालयाने पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर हा अहवाल कोर्टात सादर करण्यात आला आहे.
तज्ज्ञांनी केलेल्या पाहणीनंतर अंबाबाईच्या मूर्तीच्या गळ्याखालच्या भागाची झीज झाली आहे. २०१५ मध्ये झालेल्या रासायनिक संवर्धनातील अवशेषांची झीज झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. चेहरा आणि किरीट या भागाचे तातडीने संवर्धन करणे गरजेचं असल्याचे समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे.संवर्धन करण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य मूळ पाषाणावर टिकत नसल्याने मूर्तीवरील थर निघत असल्याचे अहवालात म्हंटले आहे. मूर्तीची झीज झाल्याच्या पार्श्वभूमीवर संवर्धन करण्यासाठी दावा दाखल करण्यात आला आहे. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर कोल्हापुरात याठिकाणी सुनावणी सुरु आहे. यामुळे लवकरात लवकर मूर्तीचे संवर्धन करणे आवश्यक असल्याचे दिसून येतंय.