तैवान आणि जपानमधील भूकंपाची घटना ताजी असतानाच आता हिमाचल प्रदेशातही भूकंप झाल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हिमाचल प्रदेशातील चंबा परिसरात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. या भूकंपाचे केंद्र चंबा असले तरी 350 किलोमीटर अंतरावर असलेल्या मनालीतही भूकंपाचे सौम्य धक्के अनुभवायला मिळाले. हा भूकंप 5.3 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा असल्याची नोंद करण्यात आली आहे. हिमाचलमध्ये भूकंपाचे धक्के जाणवण्याच्या काही मिनिटांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत .भूकंपाचे केंद्र जमिनीच्या पृष्ठभागापासून सुमारे 10 किमी खाली आहे.नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी विभागाने यांसंदर्भात माहिती दिली आहे.
समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, रात्री साडेऊनच्या सुमारास चंबा परिसर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. चंबा परिसरात फारशी मानवी वस्ती नाही. त्यामुळे या भूकंपाच्या धक्क्यांनी कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. यापूर्वी हिमाचल प्रदेशात 1 एप्रिल1905 रोजी झालेल्या विनाशकारी भूकंपात तब्बल 1000 लोकांचा बळी गेला होता.त्यावेळी हिमाचल प्रदेशातील चामोली, लाहौल आणि स्पिती परिसरात हा तीव्र क्षमतेचा भूकंप झाला होता.
मनालीमध्ये राहणाऱ्या लोकांनी सांगितले की, त्यांना भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के काही सेकंदांसाठीच आले पण ते खूप तीव्र होते, त्यानंतर लोक घराबाहेर आले होते.