भारतीय जनता पक्ष (भाजप) नेते आणि वकील गौरव भाटिया यांनी नोएडा कोर्टात मारहाणीचा कथित व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या यूट्यूब चॅनेलविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात मानहानीची याचिका दाखल केली आहे. त्यावर सुनावणी करत हायकोर्टाने सर्व प्रतिवादी यूट्यूब चॅनलला नोटीस बजावली आहे.
मात्र, न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा यांनी सध्या ही बातमी यूट्यूब चॅनेल्सवरून हटवण्याची विनंती नाकारली असून पुढील सुनावणीची तारीख ८ एप्रिल निश्चित केली आहे. गौरव भाटिया यांनी याचिकेत म्हटले आहे की, या यूट्यूब चॅनल्सनी त्यांच्या बातम्यांमध्ये आपल्याला नोएडा कोर्टात मारहाण झाल्याचे वृत्त प्रसारित केले आहे. त्यावर आपण आक्षेप घेत आहोत.
गौरव भाटिया यांचे वकील राघव अवस्थी आणि मुकेश शर्मा यांनी उच्च न्यायालयासमोर सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. असे असतानाही गौरव भाटिया यांच्या विरोधात खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. या यूट्यूब चॅनेल्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात गौरव भाटिया यांच्या सोबत घडलेल्या घटनेचे समर्थन करण्यात आले आहे.
या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने 23 मार्च रोजी दखल घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा न्यायाधीशांकडून या प्रकरणाचा अहवाल मागवला होता. सर्वोच्च न्यायालयाने घटनेचे सीसीटीव्ही फुटेज जतन करण्याचे निर्देश दिले होते. गौरव भाटिया मार्चमध्ये नोएडा कोर्टात गेले असताना त्या दिवशी कोर्टात वकिलांचा संप होता. घटनेच्या दिवशी गौरव भाटिया आणि महिला वकिलासोबत काही वकिलांची बाचाबाची झाली.