अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळीला (Arun Gawli) मोठा दिलासा मिळासा आहे. कारण आता त्यांची तुरूंगातून कायमची सुटका होणार आहे. अरूण गवळीची मुदतपूर्व सुटका होणार आहे. 2006 च्या शासन निर्णयाच्या आधारे अरूण गवळीने शिक्षेतून सुट देण्याची मागणी केली होती. तर त्याच्या या याचिकेवर नागपूर खंडपीठात सुनावणी पूर्ण झाली होती. मात्र, कोर्टाने याबाबतचा निकाल राखून ठेवला होता. यावर आज निर्णय देताना कोर्टाने अरूण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत.
10 जानेवारी 2006 रोजी शासनाच्या निर्णयामध्ये वयाची 65 वर्षे पूर्ण केलेल्या, शारीरिकदृष्ट्या अशक्त असलेल्या आणि कारावासाची निम्मी शिक्षा पूर्ण केलेल्या कैद्यांना उर्वरित शिक्षेत सूट देऊन कारागृहातून मुक्त करण्याची तरतूद आहे. या तरतूदीच्या आधारे अरूण गवळीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याने न्यायालयात वयाची 65 वर्षे पूर्ण झाली आहेत, निम्मा कारावास भोगला आहे आणि विविध शारीरिक आजारही जडले आहे त्यामुळे मला कारागृहातून मुक्त करण्यात यावे, अशी विनंती केली होती.
यावर निर्णय देताना न्यायालयाने अरूण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत. पण, यासंदर्भात उत्तर देण्यासाठी जेल प्रशासनाला चार आठवड्यांचा अवधी देखील दिला आहे.
दरम्यान, अरूण गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. 2 मार्च 2007 रोजी ही घटना घडली होती. त्यामुळे गवळी नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे.