भारतातील दलित समाजाच्या सक्षमीकरणाला दिशा-आकार-गती देणारे एक कल्पक नेतृत्व. सार्वजनिक जीवनामध्ये नेतृत्व कसे असावे याचे एक आदर्श उदाहरण म्हणून बाबू जगजीवनराम यांच्या जीवनाकडे पाहिले जाते. सर्वसामान्य भारतीय नागरिकाला प्रेरणादायी वाटते यातच त्यांच्या यशस्वी कर्तृत्वाचे रहस्य दडलेले आहे. बाबूजी केवळ दलितांच्या हक्कांसाठी लढणारे नेते नव्हते, ते अथक सेवाकार्य करण्यासाठीही परिचित होते. बाबूजी एक सुविख्यात सामाजिक कार्यकर्ते होते, तळागाळाचे नेते होते. समाजव्यवस्थेची त्यांना सूक्ष्म जाण होती. ते अभ्यासू संसदपटू होते, कुशल प्रशासक होते, मागास आणि दलित समाजाचे निर्विवाद नेते होते आणि अनुभवी केंद्रीय मंत्रीही होते.
♦️धर्मांतरास विरोध♦️
बाबू जगजीवन राम यांचा जन्म १ एप्रिल १९०८ मध्ये बिहारमधील चांदवा नामक खेड्यात झाला. लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. दहावीत असताना बाबूजी वर्गात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले, परंतु पुढील शिक्षण घेण्यासाठी आर्थिक पाठबळ त्यांच्या आईकडे नव्हते. लखनऊ मधील ख्रिश्चन स्कूलमध्ये बाबुजींनी शिक्षण घ्यावे यासाठी तिथल्या नन्सनी बाबुजींना फीमध्ये सवलत देऊ केली. पदव्यूत्तर शिक्षणासाठी बाबूजींना अमेरिकेत पाठवण्याची तयारीही त्यांनी दाखवली. त्यांच्या मातोश्री वासंतीदेवी यांनी विनम्रपणे ती ऑफर नाकारली. आपल्या मुलानं ख्रिश्चन स्कूलमध्ये जावं, नाईलाजानं का होईना उद्या ख्रिश्चन बनावे हे त्यांना मान्यच नव्हते.
♦️मातृभूमीची सेवा♦️
ऐन तारुण्यातच त्यांना मातृभूमीसाठी काही करण्याच्या इच्छेने झपाटले होते. त्यांनी हाती घेतलेली पहिली देशव्यापी मोहीम होती दलितांना मतदानाचा अधिकार प्राप्त करून देण्यासाठीची. बाबुजीनी दलितांच्या सक्षमीकरणाचा प्रयत्न तरुण वयात केला होता. दलितांमधल्या शेतमजूर वर्गाला संघटित करून त्यांची चळवळ त्यांनी उभी केली होती. ‘कसेल त्याची जमीन’ हा त्यांचा नारा होता.
१९३४ साली नेपाळ-बिहार सीमेवर भूकंपातील आपद्ग्रस्तांना मदत करण्यासाठी बाबूजी धाऊन गेले होते. ऐन तरुण वयापासूनच सार्वजनिक जीवनाशी अशा प्रकारे संलग्न राहिल्याने बाबूजी एक प्रभावी आणि सुविख्यात नेते म्हणून ओळखले जाऊ लागले होते.
♦️समाजपरिवर्तनासाठी प्रयत्न♦️
सामाजिकदृष्ट्या परस्परावलंबी समाज निर्माण व्हावा. त्यासाठी दलित समाजान संघर्ष करावा आणि समान हक्कांच्या तसेच समान कर्तव्यांच्या जाणिवांच्या आधारे भाग घेत समाजात परिवर्तन घडवून आणावे, समाजात क्रांतिकारक बदल घडेल असे पहावे हा त्यांचा आग्रह असे.
दलित समाजाच्या कल्याणासाठी झटणं हे त्यांचं जीवनध्येयच होते. जातीयते विरोधातील आपला संघर्ष लोकशाही समाज संकल्पनेतील मूल्य आणि घटनात्मक पद्धतीने स्थापित परिवर्तन प्रक्रिया यावर आधारित आहे, याचा पुनरुच्चार एका राष्ट्रीय परिचर्चेत भाग घेताना बाबुजींनी केला होता. ‘कुणाविषयीही द्वेष नाही आणि औदार्य मात्र सर्वांविषयी’ हे त्यांचे ध्येयवाक्य होते. समाजबांधवांनी आपले हक्क आणि आपले अधिकार जाणून घ्यावेत, यासाठी बाबूजी अथकपणे प्रयत्नशील राहिले. व्यक्तिगत स्वातंत्र्य आणि मानवी अस्मिता याला अधिक महत्त्व असावे अशी त्यांची भूमिका होती. समानता आणि सामाजिक न्याय हा
हिंदुत्वाच्या चौकटीत राहूनच दलित बांधवांना मिळाला पाहिजे यासाठी बाबूजी आग्रही होते. काशीतील विश्वनाथ मंदिर, मदुराईतील मीनाक्षी मंदिर आणि पुरीलील जगन्नाथ मंदिराचे दरवाजे दनितांना खुले करण्यात त्यांचाही मोठा सहभाग होता.दुष्काळाच्या भीषण संकटातून देशाला सुखरूप बाहेर काढण्याचं काम तर बाबुजींनी केलंय, परंतु हरित क्रांतीची बीजही त्यांच्याच कारकिर्दीत रुजली.
(संदर्भ – ‘दलित इतिहासाचे आधुनिक शिल्पकार’ मूळ लेखक सुदर्शन रामबद्रन, गुरु प्रकाश पासवान मराठी भावानुवाद सुधीर जोगळेकर )
सौजन्य -विश्व संवाद केंद्र,पुणे