भारतीय सिनेसृष्टीत अनेक पाकिस्तानी कलाकारांनी काम करत आपली छाप उमटवली आहे. पण काही पाकिस्तानी कलाकारांना भारतात बॅन करण्यात आलं आहे. तर याबाबत नुकतंच एका पाकिस्तानी अभिनेत्रीने खळबळजनक वक्तव्य केलं आहे. भारतातील सेलिब्रिटी आपल्याला घाबरतात, असे वक्तव्य पाकिस्तानी अभिनेत्रीने केलं आहे. तसंच या अभिनेत्रीने तिन्ही खानचा म्हणजेच सलमान खान (Salman Khan), शाहरूख खान (Shah Rukh Khan) आणि आमिर खानचा (Aamir Khan) देखील उल्लेख केला आहे. तर सध्या या अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
पाकिस्तानी अभिनेत्री नादिया खान (Nadia Khan) ही सध्या तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. नादिया खानने नुकतंच पाकिस्तानी शो ‘क्या ड्रामा है’मध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमात बोलताना नादियाने भारतीय कलाकारांवर टीका केली आहे. तसेच तिने शाहरूख, सलमान आणि आमिर खानवर गंभीर आरोपही केले आहेत.
व्हायरल झालेल्या व्हिडीओत नादिया म्हणाली की, “हिंदी चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर अभिनेता फवाद खान आणि अनेक पाकिस्तानी कलाकार संपूर्ण भारतात लोकप्रिय झाले आहेत. त्यामुळे भारतातील अनेक टॉपचे कलाकार इनसिक्योर झाले आहेत. इनसिक्योर झाल्यामुळे भारतीय कलाकारांनी दोन्ही देशांमध्ये राजकीय वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या कलाकारांना तिथे बंदी घातली.”
“भारतातील टॉपचे कलाकार आपल्याला घाबरतात, त्यामुळे त्यांनी पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी घातली आहे. आपले कलाकार जे काम डोळ्यांनी करू शकतात ते तिथले कलाकार त्यांच्या अॅक्शनने करू शकत नाहीत. त्यामुळे भारतीय प्रेक्षक आपल्या कलाकारांवर प्रेम करतात”, असे नादिया म्हणाली.
https://twitter.com/ashilikeit/status/1775469426181320833
पुढे ती म्हणाली, अलीकडेच आपले अभिनेते बिलाल खान आणि वहाज अली यांनी जे काही केले आहे त्यामुळे भारतीय जनता त्यांच्या प्रेमात पडली आहे. त्यामुळे तिन्ही खान (शाहरूख खान, सलमान खान आणि आमिर खान) इनसिक्योर झाले आहेत. जर ही मुलं आमच्या चित्रपटात आली तर आम्ही काय करणार? असा प्रश्न त्यांना पडला आहे, असंही नादिया म्हणाली. दरम्यान, सध्या नादियाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून तिच्या या दाव्याने चर्चांना उधाण आले आहे.