दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी (Atishi) यांच्या अडचणी वाढू शकतात. कारण भाजपमध्ये (BJP) न आल्यामुळे धमक्या मिळाल्याचा आरोप आतिशी यांनी केला होता. तर याची निवडणूक आयोगाने (Election Commission) दखल घेत आतिशी यांना नोटीस पाठवली आहे. आतिशी यांना सोमवारी दुपारी 12 वाजेपर्यंत या नोटिशीला उत्तर द्यावे लागणार आहे. नोटीसच्या प्रत्येक परिच्छेदाला लेखी उत्तर द्यावे, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
यापूर्वी भाजपने आतिशी यांना नोटीस पाठवून पक्षात येण्याची ऑफर कोणाकडून आली आहे हे उघड करावे, असे सांगितले होते. सत्य बाहेर न आल्यास कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब केला जाईल, असे भाजपने म्हटले होते.
आतिशी यांनी तीन दिवसांपूर्वी आरोप केला होता की, मला भाजपमध्ये येण्याची ऑफर आणि धमकी दोन्ही मिळाल्या होत्या. येत्या 2 महिन्यात 4 आप नेत्यांना अटक होणार असल्याचा दावा त्यांनी केला. आतिशी यांच्या म्हणण्यानुसार, त्याच्यानंतर सौरभ भारद्वाज यांना अटक केली जाईल. त्यानंतर दुर्गेश पाठक आणि राघव चड्डा यांनाही अटक केली जाईल.
आप नेत्या आतिशी यांनी 2 एप्रिल रोजी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, ‘माझ्या जवळच्या व्यक्तीच्या माध्यमातून मला भारतीय जनता पक्षात सामील होण्यासाठी संपर्क साधण्यात आला होता. एकतर भाजपमध्ये जा आणि माझी राजकीय कारकीर्द वाचवा, असे मला सांगण्यात आले. मी भाजपमध्ये प्रवेश केला नाही तर महिनाभरात मला अटक केली जाईल. तसेत येत्या काही दिवसांत आम आदमी पक्षाच्या आणखी काही नेत्यांना अटक होऊ शकते, असे त्या म्हणाले होत्या.
‘आम आदमी पार्टीचे वरिष्ठ नेतृत्व कोठडीत आहे. मात्र रविवारी रामलीला मैदानावर लाखो लोकांचे आगमन आणि आम आदमी पक्षाच्या रस्त्यावरील संघर्षानंतर भाजप आगामी काळात आमच्या चार बड्या नेत्यांना तुरुंगात टाकणार आहे. येत्या काही दिवसांत माझ्या वैयक्तिक निवासस्थानावर ईडी छापा टाकणार आहे. माझे नातेवाईक आणि कुटुंबीयांच्या घरावर छापे टाकले जातील. आम्हा सर्वांना समन्स पाठवले जातील आणि मग आम्हाला अटक केली जाईल, असेही आतिशी यांनी सांगितले होते.
आतिशी यांच्या पत्रकार परिषदेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 एप्रिलला भाजपने त्यांना कायदेशीर नोटीसही पाठवली होती. दिल्ली भाजपच्या मीडिया विभागाने आतिशी यांना बदनामीची नोटीस दिली आहे. तसेच पक्षाने नोटीसमध्ये विचारले आहे की, तुमच्याशी कोणी संपर्क साधला याचे पुरावे तुमच्याकडे असतील तर ते सादर करा. तसेच तुमच्याशी फोनवर किंवा वैयक्तिकरित्या कोणी संपर्क साधला होता? हे पण सांगा.