आयपीएलच्या १७ व्या हंगामात मुंबई इंडियन्सची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली आहे. सलग तीन सामने मुंबई पराभूत झाली आहे. रोहित ऐवजी हार्दिकला कर्णधार केल्याने रोहितच्या चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. मुंबई हरूदेत पण रोहित असे व्हिडीओ किंवा पोस्ट देखील व्हायरल होत आहेत. मात्र आता मुंबईची आन बान शान म्हणजे सूर्यकुमार परतला आहे. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात तो मुंबईकडून खेळणार आहे. त्यामुळे कर्णधार हार्दिक पंड्या आणि मुंबई इंडियाच्या मॅनेजमेंटचे टेन्शन कमी झाले आहे. दरम्यान मुंबई इंडियन्सने सूर्यकुमार यादवच्या कमबॅकवर पोस्ट शेअर केली आहे. तसेच सूर्याबाबतचे व्हिडीओ देखील व्हायरल होत आहेत. त्याबाबदल जाणून घेऊयात.
अखेर बंगलोरच्या फिटनेस अकादमीत फिट होऊन सूर्यकुमार यादव मुंबईच्या संघात परतला आहे. त्याच्यासाठी मुंबई इंडियन्सने अधिकृत अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओत सूर्यकुमार अक्षय कुमारच्या भूमिकेत दिसत आहे. त्याचवेळी, चाहते व्हिडिओमध्ये सूर्यकुमार यादवला ‘अक्षय कुमार यादव’ म्हणताना दिसत आहेत. मुंबई इंडियन्सची पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
७ एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यात सूर्य खेळणार आहे. सूर्यकुमार आता फिट झाल्यामुळे वानखेडेवर होणाऱ्या सामन्यात सूर्याची बॅट तळपणार आहे. मागच्या तीनही सामन्यात मुंबईचा दारुण पराभव झाला आहे. दिल्ली कॅपिटल्स देखील तीन सामन्यात पराभूत झाला आहे. त्यामुळे दोन्ही संघ आपल्या विजयासाठी वानखेडे मैदानावर उतरणार आहेत.