बंगळुरूच्या प्रसिद्ध रामेश्वरम कॅफे स्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी भाजप कार्यकर्त्याला ताब्यात घेतले आहे. सध्या त्याची चौकशी सुरू असून त्याचं दोन संशयितांसोबत कनेक्शन असल्याचं म्हटलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एनआयएने भाजप कार्यकर्ता साई प्रसाद याला ताब्यात घेतले आहे. मागील आठवड्यात एनआयएने शिवमोगा येथे छापेमारी केली होती. त्यावेळी एका मोबाईल शॉपमध्ये आणि दोन संशयितांच्या घरांवर छापे टाकण्यात आले होते. तर आरोपी साई प्रसादचं नाव मोबाईल शॉपच्या दोन कर्मचाऱ्यांनी घेतल्याची माहिती आहे ज्यांची एनआयएने गेल्या आठवड्यात चौकशी केली होती.
साई प्रसादला एनआयएने चौकशीसाठी ताब्यात घेतले असून रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणातील दोन संशयितांशी त्याचा संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. तर आरोपी साई प्रसाद हा भाजप कार्यकर्ता असल्याचं म्हटलं जात आहे.