लोकसभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेसने (Congress) आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्याला (Manifesto) काँग्रेसने ‘न्याय पत्र’ असे नाव दिले आहे. पक्षाचा हा जाहीरनामा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी संयुक्तपणे प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात काँग्रेसने 25 आश्वासने जनतेला दिले आहेत. काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यास ही हमी पूर्ण करण्याचे आश्वासन जनतेला दिले आहे. याबाबत मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, काँग्रेसचा जाहीरनामा गरिबांना समर्पित आहे. दरम्यान काँग्रेसच्या या जाहीरनाम्यावर भाजपाने जोरदार टीका केली आहे.
काँग्रेसचा जाहीरनामा फसवा असल्याची टीका भाजपाने केली आहे. भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी काँग्रेसला टोला लगावला असून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी काँग्रेसचा जाहीरनामा तयार करण्यात आल्याचे म्हटले आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने यापूर्वीच्या जाहीरनाम्यांमध्ये दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही, असे त्यांनी म्हटले आहे.