शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका करण्यासाठी नुकतीच पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी आपल्या आरोपांच्या संदर्भासाठी त्यांनी थेट प्रतीकात्मक जिवंत खेकडा सादर केला होता. मात्र आता त्यांच्या या कृतीबाबत प्राणी अधिकार संघटना ‘पिपल फॉर एथिकल ट्रिटमेंट ऑफ अॅनिमल’ अर्थात PETA ही संघटना आक्रमक झाली आहे. तसेच भाजपनं त्यांच्याविरोधात थेट निवडणूक आयोगात धाव घेतली आहे.
दरम्यान, पेटा या प्राणीमित्र संघटनेनं देखील रोहित पवारांविरोधात निवडणूक आयोग आणि शरद पवार यांना पत्र लिहून त्यांनी राजकीय प्रचारासाठी प्राण्याला त्रास दिल्याची तक्रार केली आहे. पेटाने आपल्या पत्रात म्हटले आहे की, सन २०१३ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार निवडणूक प्रचारादम्यान, गाढव, बैल, हत्ती आणि गाईंच्या वापरावर बंदी घातली होती .रोहित पवार यांचे हे कृत्य पशू क्रूरता निवारण अधिनियमाच्या आदर्श आचारसंहितेसह निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे देखील उल्लंघन आहे. यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे निर्देश याआधी दिले होते.
शरद पवार आणि जिल्हा निवडणूक अधिकारी मिनल काळस्कर यांना लिहिलेल्या पत्रात पेटा इंडियाच्या शौर्य अग्रवाल यांनी म्हटले आहे की, व्हिडिओवरुन हे स्पष्ट होतं की रोहित पवार पत्रकार परिषदेत जिवंत खेकडा आणणार होते हे पूर्वनियोजित होते . पत्रकार परिषदेत स्टंट करण्यासाठी एका जीवाला अनावश्यक त्रास देण्यात आला आहे.