गेल्या अनेक दिवसांपासून कल्याणच्या लोकसभेच्या जागेवरून महायुतीत धुसफूस चालू होती. भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या दोन्ही पक्षांनी या जागेवर दावा सांगितला होता. याच कारणामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र असूनही खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली नव्हती. मात्र आता चर्चांवर पडदा पडला असून या जागेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. कल्याणच्या जागेवर श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार असतील,आणि श्रीकांत शिंदे यांच्या पाठीमागे भारतीय जनता पार्टी खंबीरपणे उभी राहणार असल्याची देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे.
गेल्या निवडणुकीपेक्षाही या निवडणुकीमध्ये श्रीकांत शिंदे यांचा अधिक मतांनी विजय होईल. त्यासाठी महायुतीमधील सर्व पक्ष म्हणजे भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, रासपा, रिपाई असे सर्व घटकपक्ष श्रीकांत शिंदे यांनी निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. असे देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना बोलताना सांगितले आहे. फडणवीसांच्या या घोषणेमुळे आता भाजपचे कल्याणचे स्थानिक नेतृत्व काय निर्णय घेणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
त्यामुळे आता कल्याण मतदारसंघात आता शिंदे गटाकडून श्रीकांत शिंदे विरुद्ध ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर राणे यांच्यात सामना पहायला मिळणार आहे.
मात्र भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला थेट विरोध केला होता. त्यांच्या कार्यकर्त्यांनीही आम्ही श्रीकांत शिंदे यांचा प्रचार करणार नाही, असा पवित्रा घेतला होता. मात्र आता खुद्द देवेंद्र फडणवीस यांच्या ह्या घोषणेनंतर त्यामुळे गणपत गायकवाड काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.