गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि भाजपा यांच्यात युती होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात देखील दिल्लीत भेट झाली होती. दरम्यान आज शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी शिरसाट यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली आहे. या बैठकीत राजकीय चर्चा झाल्याचे समजते आहे. मात्र या भेटीमध्ये कोणतेही राजकीय चर्चा झाली नसल्याचे आमदार संजय शिरसाट म्हणाले आहेत.
काही दिवसांपासून महायुतीच्या नेत्यांची आणि राज ठाकरेंच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे महायुतीमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. याआधी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी देखील अनेकदा राज ठाकरेंची भेट घेतली आहे. आज संजय शिरसाट यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याने पुन्हा एकदा युतीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
सध्या मनसे – महायुती यांच्यात चर्चा सुरु आहेत. दिल्लीत देखील अमित शहा आणि राज ठाकरेंची भेट झाली होती. दरम्यान आपण राज्यात देखील एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात सातत्याने भेटीगाठी होत असल्याचे पाहिले आहे. भाजपा-मनसे युती झाल्यास मतांचे विभाजन टाळण्यास मदत होणार आहे. मनसेकडे मराठी वोटबँक मोठ्या प्रमाणात असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे राज ठाकरे महायुतीत आल्यास उद्धव ठाकरेंना निवडणूक कठीण जाण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंना शहा देण्यासाठी मनसेला आपल्यासोबत घेण्याची योजना भाजपने केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गुढीपाडव्याच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सर्वांशी काय बोलतात आणि सांगतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.