लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पुन्हा एकदा दहशतवादावरून पाकिस्तानला सज्जड इशारा दिला आहे. एका मुलाखतीमध्ये राजनाथ सिंह यांनी दहशतवादाविरुद्ध सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. शेजारील राष्ट्रातून पसरविल्या जाणाऱ्या दहशतवादाबद्दल प्रश्न विचारला गेला असता, राजनाथ सिंह यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. जर का एखादा दहशतवादी पाकिस्तानात पळून गेला तर , आम्ही त्याला घरात घुसून ठार मारू. देशातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास त्याला चोख प्रत्युत्तर मिळेल असे सिंह म्हणाले.
‘गार्डियन’ या ब्रिटिश वृत्तपत्रात एक बातमी प्रसिद्ध झाली आहे. भारताने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. यासंदर्भात राजनाथ सिंह यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना राजनाथ सिंह म्हणाले, ”देशात दहशतवाद्यांनी काही विपरीत केल्यास त्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल. दहशतवादी एखादी घटना घडवून पाकिस्तानात गेल्यास तर, आम्ही पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना ठार मारू.
२०१४ नंतर भारत सरकारने दहशतवादविरुद्धची लढाई अधिक तीव्र केली आहे. उरी आणि पुलवामा हल्ल्याला देखील भारताने सर्जिकल आणि एअरस्ट्राईक करून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. तसेच सध्या भारत संरक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकास करत आहे. त्यामुळे एकाचवेळी चीन आणि पाकिस्तान यांच्याविरुद्ध लढण्याची ताकद आजच्या नवीन भारतात निर्माण झालेली दिसत आहे.