पश्चिम बंगालच्या पूर्व मेदिनीपूरमधील भूपतीनगर येथे आज, शनिवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) टीमवर हल्ला करण्यात आला. कलकत्ता उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार एनआयएचे पथक शनिवारी तपासासाठी असता तपास करणाऱ्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. यामध्ये एनआयएचे दोन अधिकारी जखमी झाले आहेत. दरम्यान पश्चिम बंगालमधील मेदिनीपूरमध्ये NIA अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यावरून भारतीय जनता पक्षाने (भाजप) तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
शनिवारी येथे एका पत्रकार परिषदेत भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले की, आज ममता बॅनर्जींच्या राजवटीत पश्चिम बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचे पाहून खूप वाईट वाटते. आज टीएमसीचा अर्थ ‘दहशतवाद, माफिया, भ्रष्टाचार’ असा झाला आहे. या टीएमसी सरकारच्या काळात बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत आहे. पश्चिम बंगालमध्ये भीतीचे वातावरण आहे की केंद्रीय यंत्रणांचे अधिकारीही सुरक्षित नाहीत, मग इथे ‘माता, माती आणि मनुष्य’ कसे सुरक्षित राहणार?
एनआयएकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हायकोर्टाच्या आदेशानुसार एनआयएचे अधिकारी शनिवारी तपासासाठी भूपतीनगर येथे गेले होते. याठिकाणी एनआयएच्या पथकाने 2 आरोपींनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि त्यांना आपल्यासोबत चौकशीसाठी घेऊन जात होते. यावेळी स्थानिक गुंडांनी एनआयएच्या वाहनाला घेराव घातला आणि दोघांच्या सुटकेची मागणी करत कारवर हल्ला केला. यावेळी काही लोकांनी वाहनावर दगडफेकही केली. या हल्ल्यात एनआयएचे दोन अधिकारी किरकोळ जखमी झाले आहेत. याप्रकरणी एनआयएने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
भूपतीनगरमध्ये केंद्रीय पोलिस दलाचा मोठा ताफा तैनात करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. भूपतीनगर पोलिस स्टेशनच्या भगवानपूर 2 ब्लॉकच्या अर्जुन नगर ग्रामपंचायतीच्या नैराबिला गावात 2 डिसेंबर 2022 रोजी रात्री 11 वाजता एक भयानक बॉम्बस्फोट झाला होता. या घटनेत तृणमूलचे बूथ अध्यक्ष राजकुमार मन्ना, त्यांचा भाऊ देवकुमार मन्ना आणि विश्वजित गायन यांचा मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार एनआयएने या घटनेचा तपास हाती घेतला. न्यायालयाच्या आदेशानुसार एनआयए स्फोटाच्या घटनेचा तपास करण्यासाठी गेले असता त्यांच्यावर आज प्राणघातक हल्ला करण्यात आला.