भारतीय सैन्यदले आधुनिक होत आहेत. भारतीय वायुसेनेत अनेक नवीन फायटर प्लेन्स आणि अनेक नवीन हत्यारे जोडली जात आहेत. राफेल सारखे शक्तिशाली विमान भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात दाखल झाले आहे. त्यामुळे वायुसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दरम्यान भारतीय वायुसेनेने गगन शक्ती या मोहिमेअंतर्गत भारतीय वायुसेनेचे जग्वार, सुखोई M-30 , ग्लोब मास्टर C-17 , मिराज-2000, कैरियर एयरक्राफ्ट, हरकुएलिस- सी , चिनूक , अपाचे अशा फायटर विमानांनी आग्रा-लखनौ हायवेवर लँडिंग केले.
लखनौ-आग्रा द्रुतगती मार्गावर बांधलेल्या हवाई पट्टीवर शनिवारी लढाऊ विमानांची लँडिंगची चाचणी घेण्यात आली. उद्या या विमानांची लँडिंग करण्याची चाचणी तब्बल तीन तास चालणार आहे. लखनौ-आग्रा द्रुतगती मार्गावर बांधण्यात आलेल्या साडे तीन किमीच्या हवाई पट्टीला हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. या कालावधीत सर्वसामान्यांचा प्रवेश बंद राहणार आहे. युद्ध झाल्यास हवाई पट्टीवर विमाने उतरवण्यासाठी ही तालीम केली जात आहे. लखनौ-आग्रा एक्स्प्रेस महामार्गावरील उन्नावमधील बांगरमाऊ कोतवाली भागातील खांभोली गावासमोर हा हवाई पट्टी आहे.