लोकसभा निवडणुक (Loksabha Elections) तोंडावर आली असतानाच सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना मोठा धक्का बसला आहे. सध्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मोठा गोंधळ सुरू आहे. कारण पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने यांनी सुप्रिया सुळेंची साथ सोडली आहे. त्यांनी आता महायुतीला साथ देणार असल्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हात बळकट करण्यासाठी, इंदापूरच्या विकासासाठी आणि कार्यकर्त्यांचा आग्रह यामुळे महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा प्रचार करणार असल्याची माहिती प्रवीण माने यांनी दिली आहे. इंदापूर येथील माने परिवराच्या सोनाई निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत प्रवीण माने बोलत होते.
यावेळी प्रवीण माने म्हणाले की, मी आजपासून महायुतीच्या प्रचाराला सुरूवात करणार आहे. सुनेत्रा वहिनींनी अनेक कामे केली आहेत. फोरमच्या माध्यमातून लाखो गोर गरीबांची नेत्र तपासणी, बारामती टेक्सटाइल पार्कच्या माध्यमातून नोकऱ्या देण्याचे काम केले आहे. त्यामुळे अजित पवारांचे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रवादीत गेलो असल्याचे मानेंनी सांगितले.
दरम्यान, प्रवीण मानेंनी आता सुप्रिया सुळेंची साथ सोडली आहे. तर आता ते लोकसभा निवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांचा प्रचार करणार आहेत. तर मानेंनी घेतलेल्या भूमिकेमुळे महायुतीला बळ मिळाले असल्याचे म्हटले जात आहे.