धाराशीव (Dharashiv) लोकसभा मतदारसंघातून अर्चना राणा जगजितसिंह पाटील (Archana Patil) यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी मिळाल्यानंतर अर्चना पाटील यांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. आज (7 एप्रिल) त्या प्रचारानिमित्त बार्शीत आल्या होत्या, त्यावेळी त्यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे ज्यामुळे राष्ट्रवादीत नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे.
अर्चना पाटील या आज प्रचारासाठी बार्शीत आल्या होत्या. तर बार्शीत आमदार राजेंद्र राऊत यांचं वर्चस्व आहे. त्यामुळे तुम्ही बार्शीत राष्ट्रवादीचे वर्चस्व वाढवणार का? असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी अर्चना पाटील यांना विचारला. यावर मी कशाला राष्ट्रवादी वाढवू? असं उत्तर अर्चना पाटील यांनी दिलं.
माझा नवरा भाजपचा आमदार आहे, मी कशाला राष्ट्रवादी वाढवू? असं वक्तव्य अर्चना पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे. अर्चना पाटील यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. कारण ज्या पक्षातून त्यांना उमेदवारी मिळाली तोच पक्ष कशाला वाढवू, असं त्यांनी म्हटल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, अर्चना पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसंच अर्चना पाटील यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करत उमेदवारी घेतली आहे.