राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे पुन्हा एकदा भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. तसेच काही दिवसांपूर्वी खडसेंनी दिल्लीवारी केल्याचाही माहिती समोर आली होती. अशातच आता एकनाथ खडसेंनी आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची कबुली स्वत: दिली आहे.
एकनाथ खडसे म्हणाले की, मी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. तसंच मी शरद पवारांचा ऋणी राहीन कारण त्यांनी मला संकटकाळामध्ये मदत केली. तसंच येत्या 15 दिवसांमध्ये मी दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.
मी भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी भेट घेतली होती आणि भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार मी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. येत्या पंधरा दिवसांमध्ये हा प्रवेश व्हावा अशा माझा प्रयत्न आहे. केंद्रीय नेतृत्वाकडून मला ज्या दिवशी दिल्लीला बोलावले जाईल त्या दिवशी माझा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडेल, अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली.
पुढे ते म्हणाले की, माझा भाजपमध्ये येण्यासाठी प्रयत्न नव्हता. मात्र, भाजपमधील जुने नेते आणि कार्यकर्ते यांच्यासोबत चर्चा करत असताना तुम्ही पक्षात परत आले पाहिजे, अशी आमची आणि वरिष्ठांमध्ये होती. चार ते सहा महिन्यांपासून अशी इच्छा व्यक्त केली जात होती, असेही खडसेंनी सांगितले.