श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते |
यदं कसेविनी लेखा वतर्ते कस्यनोपरि ||
अर्थ: छत्रपती शिवरायांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची ही राजमुद्रा जणू काही स्वर्गीय तेजाने तळपत आहे, आकाशाप्रमाणे अमर्याद आहे. या राजमुद्रेच्या आश्रयात प्रत्येक माणूस, प्रत्येक प्राणिमात्र महाराजांच्या छत्रछायेखाली असेल.
ही राजमुद्रा आहे स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची. त्याची संपूर्ण कारकीर्द तेजमय होती. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची धुरा त्यांनी सक्षमपणे आपल्या हातात घेतली. अचाट धैर्य, प्रचंड पराक्रम, प्रयत्नांची पराकाष्टा व धर्माभिमान यांच्या जोरावर पाचपट मोठ्या असलेल्या औरंगजेबाच्या सैन्याबरोबर गनिमी कावा ने लढून आपले राज्य जवळजवळ १५ पटीने मोठे केले.
१४ मे १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे संभाजी महाराजांचा जन्म झाला. वयाच्या दुसऱ्या वर्षीच त्यांच्या मातेचे सईबाईंचे अकाली निधन झाले आणि त्यांचा सांभाळ आजी राजमाता जिजाऊंनी केला. संभाजी राजे अत्यंत देखणे आणि बुद्धिमान होते. लहानपणापासूनच त्यांनी राजकारणातील डावपेच, गनिमी कावा अगदी बरोबर आत्मसात केले. संस्कृत सहित तेरा भाषांचे उत्तम ज्ञान असणाऱ्या संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षीच ‘बुधभूषण ‘ हा ग्रंथ ३ भागात लिहिला व आणखीन काही ग्रंथांचे लेखन करून घेतले.
वयाच्या नवव्या वर्षीच राजा जयसिंग कडे राजकीय बंधक म्हणून त्यांना जावे लागले. शिवाजी महाराज आग्रा मोहिमेवर असताना त्यांच्या सुटकेपर्यंत अनेक गोष्टी त्यांनी जवळून पाहिल्या. आग्र्याहून रायगडावर पुन्हा परत येत असताना संभाजी राजांच्या बुद्धीच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. २० नोव्हेंबर १६६६ रोजी ते औरंगजेबाच्या हातातून अगदी सुखरूप पणे राजगडा वार पोहोचले.
छत्रपती शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराज यांनी अगदी अल्पकाळात आपल्या साम्राज्याचा पंधरा पट विस्तार केला. मराठा साम्राज्य नेस्तनाबूत करण्यासाठी आलेल्या औरंगजेबाला पुरते जेरीस केले व अनेक शत्रूंशी एक हाती लढा दिला. शहाबुद्दीन फिरोज रामशेज किल्ल्यावर चाल करून आला असता हा किल्ला सहज हस्तगत करता येईल असा मोगलांचा समज होता. पण संभाजी महाराजांनी या किल्ल्यावर रसद पोहोचवण्यासाठी खास तुकडे तैनात केली आणि हा किल्ला पाच वर्ष झुंजवत ठेवला.
शिवाजी महाराजां प्रमाणे संभाजी महाराजांनी सुद्धा अनेक देवस्थाने मठ सतपुरुष यांना वार्षिक नेमणुका पूर्ववत करून दिल्या व सढळ हस्ते मदत केली.
संभाजी महाराजांनी सक्तीने धर्मांतर करणाऱ्या इंग्रज, पोर्तुगीज, व मुसलमा सत्ताधीशांना कडाडून विरोध केला.
गणोजी शिर्के या नातेवाईकांनी केलेल्या फीतूरीमुळे औरंगजेब संभाजी महाराज व त्यांचे सल्लागार कवी कलश यांना कैद करण्यात यशस्वी झाला.
औरंगजेबाने संभाजी राजे आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना पकडले. त्यांचा अपमान करून त्यांना विदूषकाचे कपडे घालायला लावले आणि मृत्यूपूर्वी त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले. पंधरवड्यापेक्षा जास्त दिवस त्यांना मरण यातना दिल्या, त्यांचे डोळे फोडले, जीभ कापली, नखे काढले, इतक्यावरही न थांबलेल्या औरंजेबाने त्वचाही सोलली. शेवटी ११ मार्च १६८९ रोजी वयाच्या ३१ व्या वर्षी संभाजी महाराजांवर वाघ नखाने वार करण्यात आला आणि भीमा नदीच्या काठावर तुळापूर येथे शिरच्छेद करून ठार मारण्यात आले. नंतर संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे केलेले अवशेष पुण्याजवळील वडूच्या काही लोकांनी एकत्र केले आणि शेवटी योग्य विधी आणि सन्मानाने अंत्यसंस्कार केले. असे म्हटले जाते की क्रूर छळ करूनही, संभाजी महाराजांनी व कवी कलश यांनी एकदाही औरंगजेबाकडे दयेची याचना केली नाही आणि औरंगजेबाने विचारलेल्या कोणत्याही गोष्टीचे उत्तर देण्यास नकार दिला. छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या बलिदानाचे स्मरण म्हणून पाळला जातो.
गिळण्यास प्राण उठला जरी हा कृतांत
संभाजी राजे धर्म जगले जळत्या रणात
सूर्याहून अति दाहक ही अशी धर्मशक्ती
स्फुरण्यास नित्य धरूया शिवपुत्र चित्ती
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय!!
सानिका कुलकर्णी
सौजन्य – समिती संवाद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत