पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात येत आहेत.भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी तब्बल 10 वर्षांनी आज मोदी चंद्रपुरात येणार आहेत. दुपारी साडेचारच्या सुमारास मोदी चंद्रपुरात येतील असे म्हटले जात आहे.त्यानंतर त्यांची विराट सभा होणार आहे. लोकसभा निवडणुकींच्या प्रचाराचे रणशिंग आज मोदी चंद्रपुरातून फुंकणार असल्याचे सांगितले जात आहे.चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्यात थेट लढत चंद्रपुरात पाहायला मिळणार आहे.
चंद्रपूर शहराजवळ मोरवा विमानतळाच्या अगदी बाजूला विस्तीर्ण 16 एकर परिसरात मोदींच्या सभेची तयारी केली जात आहे.दुपारी चार वाजता होणाऱ्या या सभेसाठी भाजपने युद्ध स्तरावर यंत्रणा राबविली आहे.हा संपूर्ण परिसर सुरक्षेच्या दृष्टीने अनुकूल करण्यात आला असून सुमारे एक लाख लोक या सभेला यावेत या दृष्टीने नियोजन सुरू आहे. आसपासच्या लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आणि भाजपचे समर्थक देखील या सभेला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणूक 2024 च्या रणातील मोदींची महाराष्ट्रातील ही पहिलीच जाहीर सभा संख्येच्या दृष्टीने परिणामकारक करण्याचे भाजपचे प्रयत्न चालू आहेत.
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघामध्ये महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत .सुधीर मुनगंटीवार हे महाराष्ट्र राज्यातील आमदार आहेत. ते सध्या महाराष्ट्र सरकारचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय या तीऩ खात्यांचे कॅबिनेट मंत्रीही आहेत. विकास कामे आणि चंद्रपूरच्या विविध घटकांच्या प्रगतीच्या दृष्टीने विविध प्रकल्प राबविण्यात मुनगंटीवार यांना यश आले आहे.
अनेकविध योजनांच्या माध्यमातून तळागाळातील सामान्य नागरिक, महिला आणि इतर गोरगरिबांचा जीवनस्तर उंचावण्याचा प्रयत्न मोदी सरकारने यशस्वीपणे केला आहे आणि हाच धागा पकडत मुनगंटीवार यांनी महाराष्ट्राची प्रगती साधताना एक नवा आदर्श भारतीयांपुढे निर्माण केला असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी मुनगंटीवार यांच्या कार्याची जाहीरपणे प्रशंसा केलेली आहे. यात २ कोटी वृक्ष लागवड, चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी मिशन शोर्य अंतर्गत केलेल्या कामगिरीबद्दल मन की बात मध्ये कौतुक,ताडोबा अंधारीमध्ये आभासी भिंतीचा प्रयोग,ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी केलेल्या प्रयोगाचे सुद्धा मोदींनी कौतुक केले आहे.
दरम्यान विकासकामांमुळे नागरिकांच्या जीवनात झालेले सकारात्मक बदल मला निवडणुकीत नक्कीच साथ देतील. या प्रवासात पंतप्रधान नरेंद्र मोदी मला आशीर्वाद देण्यासाठी येत असल्याने मला अतीव आनंद होत आहे.अशा भावना मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या आहेत .