साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार असलेल्या रजनीकांत (Rajanikanth) यांची मुलगी ऐश्वर्या (Aishwarya) रजनीकांतने अधिकृतपणे पती आणि अभिनेता धनुषपासून (Dhanush) घटस्फोटासाठी (Divorce) अर्ज दाखल केला आहे. रिपोर्टमध्ये दावा केला जात आहे की, या जोडप्याने परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.
ऐश्वर्या आणि धनुषने 17 जानेवारी 2022 रोजी एकमेकांपासून वेगळे होण्याची घोषणा केली होती. मात्र, नंतर अशा बातम्या आल्या की ते त्यांच्या नात्याला आणखी एक संधी देऊ शकतात. अशातच आता ऐश्वर्या आणि धनुषने कायदेशीररित्या एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. या जोडप्याने चेन्नईच्या कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाची याचिका दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, धनुष आणि ईश्वर्याने कलम 13-बी अंतर्गत कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचा अर्थ असा की, त्यांना परस्पर संमतीने घटस्फोट घ्यायचा आहे. दोघांच्या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार आहे. 2022 मध्ये विभक्त झाल्याची घोषणा झाल्यापासून धनुष आणि ऐश्वर्या वेगळे राहत आहेत.