लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक सर्व्हे समोर येत आहेत. अनेक निवडणुकीत प्रचंड अभ्यास असणारे रणनीतीकार यंदाच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाला कोणत्या लोकसभा मतदारसंघात किती जागा मिळणार याबाबत आपले अंदाज व्यक्त करत आहेत. दरम्यान यंदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी हा पश्चिम बंगालमधील एक नंबरचा पक्ष होण्याचा अंदाज निवडणूक रणनीतीकार आणि जन सूरजचे नेते प्रशांत किशोर यांनी व्यक्त केला आहे.
भाजपा आणि तृणमूल काँग्रेस मधील राजकारण आपल्याला माहितीच आहे. पश्चिम बंगालमधील वाढती गुन्हेगारी आणि इतर बाबींवरून भाजपा कायमच बंगाल सरकारला म्हणजे ममता बॅनर्जी यांच्यावर आरोप करत असते. मात्र प्रशांत किशोर यांच्या अंदाजानुसार लोकसभा निवडणुकीत भाजपा बंगालमध्ये एक नंबरचा पक्ष होण्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत प्रशांत किशोर म्हणाले की, भाजपने गेल्या काही वर्षांत दक्षिण आणि पूर्व भारतात आपले अस्तित्व वाढवण्यासाठी कठोर परिश्रम केले आहेत. यावेळी त्याचा फायदा पक्षाला मिळू शकतो. बंगालमध्ये भाजप नंबर १ पक्ष म्हणून उदयास येईल, असे मला वाटते, असे प्रशांत किशोर म्हणाले.
बंगाल आणि दक्षिण भारतात भाजपाने आपले स्थान अधिक मजबूत करण्यासाठी गेल्या काही वर्षांत अत्यंत कठोर परिश्रम घेतले आहेत. भाजपा नेहमी निवडणुकीत उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, आसाम म्हणजेच उत्तर, मध्य भारतात जास्त प्रमाणात जागा जिंकते. यंदाच्या निवडणुकीत एनडीएने अब की बार ४०० पार असा नारा दिला आहे. यामध्ये भाजपाने ३७० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि भाजपाच्या स्टार प्रचारकांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे.